Advertisement

गणपतीबाप्पा मोरया, वाटेतले बॅरीगेटस् काढुया


गणपतीबाप्पा मोरया, वाटेतले बॅरीगेटस् काढुया
SHARES

असंख्य भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भव्यदिव्य देखावे, उंच गणेश मूर्ती आणि गणपती विसर्जनाच्या भव्यदिव्य मिरवणूका. अशावेळी भव्यदिव्य मंडप बांधत देखावे तयार करणे असो वा उंच गणेश मूर्ती वाजत गाजत आणत त्यांची प्रतिष्ठापना करणे असो वा त्यानंतर बाप्पाच्या निघणाऱ्या भव्य मिरवणूका असोत, या सर्व बाबींमध्ये यंदा मेट्रोचा मोठा अडथळा येणार आहे. कारण दक्षिण मुंबईत मेट्रो-3 चे उपनगरात मेट्रो-2 आणि मेट्रो-7 चे काम सुरू असून या कामासाठी रस्तोरस्ती बॅरीगेटस् लावत रस्तेच बंद करण्यात आले आहेत. गणेशोत्सवातील ही अडचणी दूर करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन(एमएमआरसी)सह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)कडे करण्यात आली आहे. पण या मागणीकडे एमएमआरसीकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर गिरगावकर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी एमएमआरसीला बॅरीगेटस् हटवण्यास भाग पाडले आहे. गिरगावकरांना बाप्पा पावल्याने आता गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात पार पडणार आहे. पण त्याचवेळी इतर गणेशोत्सव मंडळांचे काय? त्यांना बाप्पा आणि मेट्रो पावणार का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.


विघ्नहर्त्याच्या मार्गात अडथळे नकोत

मेट्रो-3, मेट्रो-2 आणि मेट्रो-7 च्या कामासाठी कुलाब्यापासून दहिसरपर्यंत बॅरीगेटस् लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाले असून वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता दहीहंडी उत्सव तोंडावर आला असून गणेशोत्सवाच्या तयारीलाही सुरूवात झाली आहे. पण दहिहंडी ही शक्यतो मुख्य रस्त्यांवरच बांधली जाते. तर गणेशोत्सव मंडळांचे मंडपही मोठ्या, मुख्य रस्त्यांवर असतात. तर गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जन मुख्य रस्त्यांवरूनच होते. त्यामुळे यंदा मेट्रोमुळे दहीहंडीसह गणेशोत्सवात विघ्न येणार, हे याआधीच निश्चित झाले होते. त्यामुळेच गिरगावातील स्थानिक शिवसेना नेत्यांसह बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीकडून मेट्रोचे बॅरीगेटस् हटवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे.

समन्वयक समितीने 7 ऑगस्ट रोजीच यासंदर्भातील मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती समन्वयक समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवत यासंबंधीचे आदेश एमएमआरसीला देण्याचे आश्वासन दिले आहे. तर लवकरच एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांचीही भेट घेणार असल्याचेही दहिबावकर यांनी सांगितले आहे. हे बॅरीगेटस् लवकरच हटवले जातील आणि गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात पार पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


गिरगावकरांची एकजूट

असे असताना दुसरीकडे गिरगावातील शिवसैनिक आणि गणेशोत्सव मंडळांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. जगन्नाथ शंकरशेठ रोडवर मोठ्या प्रमाणावर दहीहंडी बांधण्यात येत असताना याच रस्त्यावर बॅरीगेटस् असल्याने गिरगावकरांची चिंता वाढली होती. तर गणेशोत्सवाच्या तयारीतही अडचणी येत होत्या. त्यामुळे शनिवारी शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यासह शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बॅरीगेटस् काढण्याची मागणी केली. पण एमएमआरसीचे अधिकारी आणि कंत्राटदार हे काही मानायला तयार नव्हते. त्यामुळे प्रचंड वादावादी झाली आणि शेवटी रहिवाशी आणि शिवसैनिकांचा संताप लक्षात घेत त्यांनी बॅरीगेटस् काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सकपाळ यांनी दिली आहे. त्यानुसार काही बॅरीगेटस् काढण्यात आले असून उर्वरित बॅरीगेटस् काढण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पण आता इतर ठिकाणची बॅरीगेटस् एमएमआरडीए आणि एमएमआरसी कधी हटवणार हाच आता प्रश्न आहे.

दरम्यान, यासंबंधी एमएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी एस. के. गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी याविषयी काहीही बोलणार नसल्याचे म्हणत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांच्यासह काही वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण  त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


दहीहंडी ते अनंत चतुर्दशीपर्यंत बॅरीगेटस् हटवण्याची आमची मागणी होती. पण याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एमएमआरसीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्यानंतर ही मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार अनंत चतुर्दशीपर्यंत जगन्नाथ शंकर शेठ रोड बॅरीगेटस् मुक्त राहणार आहे. म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत मेट्रोचे काम बंद राहणार आहे. तसे आश्वासनही संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले आहे. त्यामुळे आता दहीकाला आणि गणेशोत्सव दोन्ही सण निर्विघ्न पार पडणार आहेत.

-पांडुरंग सकपाळ, शिवसेना विभागप्रमुख, गिरगाव




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा