गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळप्रकरणी आतापर्यंत मूग गिळून गप्प असलेलं म्हाडा मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर जागं झालं आहे. शुक्रवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी तातडीने सिद्धार्थ नगर को. आॅप. हाऊसिंग सोसायटी लि. च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सोसायटीला २ दिवसांत थकीत भाड्याच्या रकमेसंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देत दणका दिला.
एकीकडे पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे म्हाडाला सुमारे १ हजार कोटींचा चुना लावणाऱ्या गुरूआशिष बिल्डरकडून प्रकल्प काढून घेत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे पत्राचाळ पुनर्विकासाच्या कामाचा चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या म्हाडातील एका अभियंत्याचं तातडीने निलंबनही करण्यात आलं.
गुरूआशिष बिल्डरने २००९ मध्ये ६७२ रहिवाशांना भाडे देत इतरत्र स्थलांतरीत केलं. सुरूवातीचे काही महिने रहिवाशांना भाडं मिळालं खरं, पण नंतर हळूहळू बिल्डरने भाडं थकवण्यास सुरूवात केली, तर काही रहिवाशांचं भाडंच बंद केलं. त्यामुळे आजच्या घडीला किमान २०० रहिवाशांचं तब्बल ६० महिन्यांचं भाडं थकीत आहे. तर काही रहिवाशांचं ६ ते १७ महिन्यांचं भाडं थकीत असल्याची माहिती पत्राचाळीतील रहिवासी पंकज दळवी यांनी दिली आहे.
भाडं मिळत नसल्याने रहिवाशांना स्वत: च्या खिशातून भाडं भरावं लागत असल्याने अनेक रहिवासी आर्थिक अडचणीतही आले आहेत. दरम्यान भाडं मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी सोसायटीकडे गाऱ्हाणं मांडलं, पण सोसायटीने मात्र याकडे कानाडोळाच केला. खरं तर भाड्याची रक्कम रहिवाशांना बिल्डरकडून मिळवून देण्याची जबाबदारी सोसायटीची असताना सोसायटी मात्र बिल्डरलाच अभय देत होती, असा आरोपही रहिवाशांरकडून सातत्याने होतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत रहिवाशांनी ही बाबही ठळकपणे मांडली होती.
रहिवाशांच्या थकीत भाड्याचा प्रश्न मोठा आहेच, मात्र त्याचवेळी भाडं देण्यातही मोठा घोटाळा झाल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. त्यामुळेच सोसायटीविरोधातही कारवाईची मागणी केली जात होती. त्यानुसार अखेर आता सोसायट्याच्याही मुसक्या लाखे यांनी आवळल्या आहेत.
भाड्याची किती रक्कम ठरली होती, किती रहिवाशांना भाडं दिलं, किती रहिवाशांचं भाडे थकलं, कोणत्या महिन्यांपर्यंत भाडं अदा केलं, किती महिन्यांचं भाडं थकीत आहे यासंबंधीचा अहवाल आता २ दिवसांत सोसायटीला म्हाडाकडे सादर करायचा आहे.
दरम्यान भाड्याविषयीची कोणतीही माहिती सोसायटीकडून रहिवाशांना दिली जात नव्हती. तर भाडं देण्यातही मोठा गोंधळ होता. त्यामुळे आता या अहवालातून भाड्याच्या रकमेत झालेला गोंधळ, घोटाळाही समोर येईल आणि सोसायटीचेही पितळं उघडे होईल, अशी प्रतिक्रिया पत्राचाळीतील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा-
घोटाळ्यातले 'मास्टर'! म्हाडाने जाहिरात न देताच केलं शिवाजी पार्कच्या घराचं वितरण?
तीन वर्षांत गोरेगावात म्हाडाची 5 हजार घरे, यातील 2,855 घरे अत्यल्प गटासाठी