Advertisement

बीपीटीच्या जमिनीवर उभी रहाणार संक्रमण शिबिरं?


बीपीटीच्या जमिनीवर उभी रहाणार संक्रमण शिबिरं?
SHARES

गुरुवारी घडलेल्या भेडी बाजार हुसैनीवाला इमारत दुर्घटनेनंतर म्हाडाच्या अतीधोकादायक इमारतींमध्ये रहाणाऱ्या रहिवाशांच्या स्थलांतराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हे रहिवाशी अनेक नोटिसांनंतरही जिवावर उदार होऊन त्याच ठिकाणी रहात आहेत. दूर ठिकाणी उपलब्ध होणारी संक्रमण शिबिरं आणि हक्काचं घर पुन्हा मिळण्याची साशंकता यामुळे हे रहिवाशी स्थलांतर करत नसल्याचं समोर आलं आहे.

मात्र आता राज्य सरकारने दक्षिण मुंबईतच या रहिवाशांना संक्रमण शिबीर उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या बीपीटीची 100 एकर जमीन मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.


मृत्यू उभा दाराशी...

दक्षिण मुंबईतील म्हाडाच्या अनेक उपकरप्राप्त इमारती अतीधोकादायक यादीमध्ये आहेत. या इमारती कधी कोसळतील याची कोणतीही शाश्वती नाही. मात्र तरीही रहिवासी स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत नाहीत. गुरूवारी भेंडीबाजारमधील हुसैनीवाला इमारत कोसळली आणि 34 जणांचा नाहक बळी गेला. या रहिवाशांना म्हाडासह या इमारतीचा पुनर्विकास करणाऱ्या बुऱ्हाणी ट्रस्टकडून वारंवार नोटिसा देत इमारत रिकामी करण्यास सांगितले जात होते. पण रहिवाशांचा हट्ट नडला आणि 34 जणांना प्राण गमवावा लागला.


रहिवाशांच्या नकारास कारण की...

म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेल्यानंतर पुन्हा हक्काच्या घरात कधी येणार? याचे उत्तर कुणाकडेही नसते. शिवाय दक्षिण मुंबईत राहणाऱ्या रहिवाशाला थेट गोराई, कन्नमवार नगर, प्रतिक्षानगर अशा ठिकाणी स्थलांतरीत केले जाते. त्यामुळे हे रहिवासी म्हाडाच्या संक्रमण शिबिरात जायला नकार देत मृत्यूच्या सावटाखालीच जगणे स्वीकारतात.

आजच्या घडीला दुरूस्ती मंडळाकडे 1000 संक्रमण शिबिराचे गाळे असून ही गाळे गोराईत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतून थेट गोराईत जाण्यास रहिवाशी नकार देत आहेत. शाळा, कॉलेज आणि नोकरी धंदा सोडून कसे जायचे? हा मुख्य सवाल रहिवाशांचा आहे.


मुंबईत गाळेच शिल्लक नाहीत!

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडे दक्षिण मुंबईत, शहरात संक्रमण शिबिराचे गाळेच नसल्याने रहिवाशांना उपनगरात स्थलांतरीत करावे लागत आहे. जवळपास 56 संक्रमण शिबिरे मुंबईत आहेत. पण आता यातील अनेक संक्रमण शिबिरे जुनी-जीर्ण झाली असून ही संक्रमण शिबिरे खच्चून भरली आहेत. त्यामुळे आजच्या घडीला शहरात दुरुस्ती मंडळाकडे संक्रमण शिबिराचा एकही गाळा शिल्लक नाही. त्यातच गिरणी कामगारांच्या घराच्या योजनेतून जे संक्रमण शिबिराचे गाळे उपलब्ध झाले आहेत, ते म्हाडाच्या मुंबई मंडळाने बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी राखीव ठेवत दुरुस्ती मंडळाला देण्यास चक्क नकार दिला आहे. सध्याच्या एकूण मागणीनुसार भविष्यात अंदाजे किमान 25 हजार कुटुंबियांना स्थलांतरीत करण्याची गरज भासणार आहे.


बीपीटीची 100 एकर जमीन

शहरात मोठ्या संख्येने संक्रमण शिबिराचे गाळे उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य सरकारकडून बीपीटीची 100 एकर जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. केंद्र सरकारने ही जमीन दिल्यास मोठ्या संख्येने गाळे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सध्या दक्षिण मुंबईतील जिजामाता संक्रमण शिबिराचा पुनर्विकास करुन तिथे गाळे उपलब्ध करुन देण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आल्याचे भांगे यांनी सांगितले आहे. तसेच जिजामाता संक्रमण शिबिरालगतच एक मोकळा भूखंड असून त्यावरही संक्रमण शिबिरे बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यातून उपलब्ध होणारे गाळे कमी असल्याने राज्य सरकार आणि म्हाडाने बीपीटीच्या जमिनीकडे मोर्चा वळवला आहे.


रवींद्र वायकरांचं आश्वासन

शुक्रवारी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी हुसैनीवाला दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत बीपीटीच्या या जमिनीवर चर्चा झाली. ही जमीन मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे वायकर यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही वायकर यांनी आश्वासित केल्याचे भांगे यांनी सांगतिले. मात्र ही जमीन ताब्यात येऊन बांधकाम आणि गाळे उपलब्ध होण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत दाराशी उभ्या असलेल्या मृत्यूचा या रहिवाशांना रोज सामना करावा लागणार हे नक्की!



हेही वाचा

अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर गणपती विसर्जनानंतर...


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा