पिंपळेश्वर क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दादरच्या अमरहिंद मंडळानेने ना. म. जोशी मार्गच्या जय भारत संघाचा ४१-२८ असा सहज पराभव करीत पिंपळेश्वर चषकावर नाव कोरले. जय भारतचा ओमकार मोरे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
अमरहिंदने सुरुवातच अशी झंझावाती केली की पूर्वार्धातच २५-०९ अशी आघाडी घेत आपणच या विजेतेपदाचे दावेदार असे दाखवून दिले. उत्तरार्धात मात्र त्यांना जय भारतने बऱ्यापैकी लढत दिली. पण पहिल्या डावातील आघाडीच एवढी भक्कम होती की, त्यातील अंतर त्यांना कमी करणे जमले नाही. ओमकार फोपळकर, जयेश यादव यांच्या सुरेख चढायांना जय भारतच्या बचावपटूंकडे उत्तर नव्हते. अमरहिंदचा बचाव ही भक्कम होता. ही भूमिका अनिकेत पेवेकरने व्यवस्थित पार पाडली. जय भारतकडून उत्तरार्धात ओमकार मोरे, शुभम मटकर यांनी बऱ्यापैकी लढत दिली.
उपांत्य सामन्यात अमरहिंदने सिद्धीप्रभाचा कडवा प्रतिकार २८-२३ असा तर जय भारतने विजय बजरंगचा ४०-२४ असा सरळ पाडाव करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. अमरहिंदच्या ओमकार फोपळकर आणि अनिकेत पेवेकर यांना स्पर्धेतील अनुक्रमे उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
हेही वाचा -
बाल उत्कर्ष कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी, महिंद्राला जेतेपद