Advertisement

नवशक्ती, शिवनेरी, संघर्ष आणि साहसी अंतिम फेरीत


नवशक्ती, शिवनेरी, संघर्ष आणि साहसी अंतिम फेरीत
SHARES

ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत हेविवेट रुपाली महाडिकने आपल्या जोरदार चढायांनी विशाल स्पोर्ट्स, कुर्ल्याचा भक्कम बचाव खिळखिळा करत शिवनेरी क्रीडा मंडळ,घाटकोपर संघाला 42-34 असा विजय मिळवून देत तिने संघाला अंतिम फेरी  गाठून दिली. 

पूर्वार्धात स्वतःच्या चुकांमुळेच तिचा संघ 12-23 असा पिछाडीवर पडला होता तसेच उत्तरार्धातही 8 गुणांची पिछाडी असल्याने पराभवाची चिन्हे दिसत होती. मात्र एका चढाईत 4 व त्यानंतर दुसऱ्या चढाईत 2 प्रतिस्पर्ध्यांना टिपत दोन तिने लोन देण्यात यश मिळविले. ही आघाडी कायम राखत रुपालीने आपल्या अननुभवी संघाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. शिवनेरी आणि नवशक्ती (चेंबूर) अशी अंतिम लढत होईल. नवशक्तीने महात्मा फुले स्पोर्ट्स, घाटकोपर यांचा 36-12 असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

याच स्पर्धेच्या पुरुषांच्या प्रथम श्रेणी गटात संघर्ष क्रीडा मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्राचे आव्हान 25-21 असे परतविले. मध्यंतराला 8-8 अशा बरोबरीनंतर गोरेगावच्या संघर्षने लोन चढवून आघाडी घेतली ती अखेरपर्यंत टिकविली. अनिकेत पाडलेकर आणि विनायक शिंदे यांनी आपल्या आक्रमण आणि बचावाच्या खेळाद्वारे संघर्षाला चेंबूरच्या दोन पावले पुढेच ठेवले. चेंबूरचा सागर नार्वेकर आणि त्याचा साथी आकाश कदम यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. संघर्ष आणि साहसी कला क्रीडा मंडळ,चेंबूर अशी अंतिम लढत होईल. 

एका रंगलेल्या लढतीत स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, जोगेश्वरी यांना 18-16 असे चकविले. विजयी संघासाठी आतिश शिंदे, संकेत मोरे तर पराभूत संघासाठी नितीन गिझे आणि दर्शन राऊत यांनी चांगले प्रदर्शन केले. मध्यंतराला 9-9 अशी स्थिती होती. विशाल स्पोर्ट्स क्लबच्या प्रियांका विंजळे आणि अक्षिता लाड यांचा खेळ उत्तम झाला खरा पण रूपालीला थोपविण्यात त्यांना जे अपयश आले ते त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले. भक्कम आघाडी असताना चढाईसाठी मिळणाऱ्या 30 सेकंद वेळेचा पूर्ण उपयोग त्यांनी केला असता तर, त्यांना विजय मिळविणे शक्य झाले असते. पण त्यांच्या व्यवस्थापनाला योग्य मार्गर्दर्शन करण्यात अपयश आले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा