लोअर परेल येथील स्व. गणेश गोताड क्रीडांगणावर रंगलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील कुमार गटाच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या वाघजाई संघाने पुण्याच्या उत्कर्षचा ४६-२३ असा धुव्वा उडवत शिवसेनाप्रमुख चषकावर कब्जा केला. या विजयासह महिनाभरापूर्वी मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा वाघजाईने काढला. श्रीसाई क्रीडा मंडळाने अायोजित केलेल्या या स्पर्धेत उत्कर्षने सुरुवातीलाच अोमकार कुंभारची पकड करत दमदार सुरुवात केली. मात्र खेळात सातत्य राखता न अाल्याने अाणि अोमकारच्या तुफान चढायांपुढे उत्कर्ष सपेशल फेल ठरला.
वाघजाईने भक्कम बचाव अाणि चढाईत गुण पटकावत नवव्या मिनिटालाच उत्कर्षवर पहिला लोण चढवला. त्यानंतर पूर्ण जोशाने कामगिरी करत १५व्या मिनिटाला दुसरा लोण चढवून २०-०४ अशी भक्कम अाघाडी घेतली होती. अोमकार जाधवने एका चढाईत चार गडी टिपत अाणि अजिंक्य पवारने उरलेल्या दोघांना बाद करत उत्कर्षवर तिसरा लोण चढवला. मध्यंतराला त्यांनी ३०-०५ अशी अाघाडी घेतली होती.
मध्यंतरानंतर वाघजाईने बचावाचे अाणि तितकाच सावध खेळ करण्याचे धोरण स्वीकारले. याचा फायदा उठवत उत्कर्षने वाघजाईवर पहिला लोण देत अापली पिछाडी १८-३४ अशी कमी केली. वाघजाईने सामना संपल्यास एक मिनिट शिल्लक असताना चौथा लोण देऊन ४४-२३ अशी अाघाडी घेतली. ओमकार कुंभार, अजिंक्य पवार यांच्या धारदार चढाया व शुभम शिंदेचा भक्कम बचाव यामुळेच वाघजाई संघाने हा विजय मोठ्या फरकाने मिळविला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान अोमकार कुंभारने तर उत्कृष्ट चढाईचे बक्षिस उत्कर्षच्या बबलू गिरीने अाणि सर्वोत्तम पकडीचे बक्षिस वाघजाईच्या शुभम शिंदेने पटकावले.