Advertisement

आता 'देवा'साठी खळ्ळखट्याक?


आता 'देवा'साठी खळ्ळखट्याक?
SHARES

सलमान खानचा 'टायगर जिंदा है’ या हिंदी बिग बजेट सिनेमामुळे 'देवा' या मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'महाराष्ट्रात यशराजचं शुटिंग होऊ देणार नाही' असा इशारा दिला आहे. याचसोबत मराठी चित्रपटांना स्क्रिन न देणाऱ्या मल्टिप्लेक्सचे परवाने रद्द करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहितीही त्यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

'देवा' या मराठी चित्रपटाला थिएटर न मिळाल्यास 'मनसे स्टाईलनं आंदोलन करणार', असा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

संजय निरुपम यांनी मनसेला ललकारलं


 

'मराठी सिनेमाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, मात्र त्याच्या नावे मनसेची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांनी ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सुरक्षा द्यावी. तसंच मनसेच्या गुंडांविरोधात लढण्यासाठी थिएटर मालकांना बाऊन्सर्स/ सुरक्षा रक्षक ठेवण्याची परवानगी द्यावी', असं संजय निरुपम यांनी ट्विट करत मनसेला ललकारले आहे.


मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी - शिवसेना

दरम्यान चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात शिवसेनेनंही उडी घेतली आहे.


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून 'देवा' चित्रपटाला समर्थन देत 'प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवं' असं ठणकावून सांगितलं आहे. यावेळी राऊत यांनी 'मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे', अशी खंतही बोलून दाखवली.


नितेश राणेंचीही उडी 

या सगळ्यामध्ये काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी देखील उडी घेतली आहे.



'महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे', असं आमदार नितेश राणे यांनी म्हंटलं आहे. 'महाराष्ट्रात ‘देवा’ला मारून ‘टायगर’ जीवंत रहात असेल तर त्या थिएटर्सना कुठलाच ‘टायगर’ वाचवू शकणार नाही', असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.


काय आहे वाद 

येत्या शुक्रवारी 'गच्ची' आणि 'देवा' हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर त्यांच्यासमोर सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा हिंदी बिग बजेट सिनेमा उभा टाकतोय. त्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनीही कंबर कसली आहे. मात्र सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमामुळे मराठी चित्रपट 'देवा' आणि 'गच्ची' यांना थिएटर्स मिळणं कठीण झालं आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे प्रत्येक स्क्रिनवर ५ खेळ लावा, असा मेल यशराज फिल्म्सने सर्व थिएटर मालकांना केला आहे. त्यामुळे 'देवा' आणि 'गच्ची' सारख्या मराठी चित्रपटांना थिएटर न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हेही वाचा - 

'देवा'समोर थिएटरचं विघ्नं!

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा