Advertisement

सैराटलेला 'बबन'!

एका सामान्य घरातल्या महत्वाकांक्षी युवकाची ही कथा असल्यामुळे, प्रेक्षकांना 'बबन' हा आपल्यातलाच एक वाटून जातो. विशेष म्हणजे, 'बबन' या नावातच साधेपणा असून असे अनेक बबन आपल्याला आपल्या जवळच्या नाक्यांवर, गल्ली बोळात तसेच कॉलेज कट्ट्यांवर दिसून येतात. प्रत्येक माणसातल्या 'बबन'ची हीच खासियत या सिनेमात मांडण्यात आली आहे.

सैराटलेला 'बबन'!
SHARES

सैराट चित्रपट आला आणि गावाकडच्या प्रेमकथांची लाटच आली. गावाकडचे व्यवसाय, प्रेम, रोमान्स त्यातून होणारी हाणामारी या गोष्टी आता सातत्याने चित्रपटात बघायला मिळतात. भाऊराव कऱ्हाडे यांचा 'बबन' ही काहीसा असाच. तुम्हाला बबन बघताना सतत सैराटची आठवण येईल.



बबन (भाऊसाहेब शिंदे) हा गावात राहणारा एक तरूण. आपल्या बापाने दारूत उडवलेला पैसा आणि त्यामुळे विकलेली जमीन अशा हलाखीच्या परिस्थितीत बबन दूध विकून आपलं शिक्षण घेत असतो. यातच गावातील कोमल (गायत्री जाधव)च्या तो प्रेमात पडतो. एकीकडे आपलं प्रेम मिळवण्यासाठी तर दुसरीकडे आपला दुधाचा व्यवसाय सांभाळण्यासाठी बबनला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावात तयार झालेले राजकीय गट बबनच्या प्रत्येक कामात अडथळा आणतात..त्यातून बबन कसा मार्ग काढतो याची ही कथा..



एका सामान्य घरातल्या महत्वाकांक्षी युवकाची ही कथा असल्यामुळे, प्रेक्षकांना 'बबन' हा आपल्यातलाच एक वाटून जातो. विशेष म्हणजे, 'बबन' या नावातच साधेपणा असून असे अनेक बबन आपल्याला आपल्या जवळच्या नाक्यांवर, गल्ली बोळात तसेच कॉलेज कट्ट्यांवर दिसून येतात. प्रत्येक माणसातल्या 'बबन'ची हीच खासियत या सिनेमात मांडण्यात आली आहे.



चित्रपट सुरू होताच गावातली भाषा, गावाकडच्या जनजीवनाचं दर्शन तुम्हाला घडतं. गावच्या लोकांच्या तोंडी असणाऱ्या शिव्या, रांगडी भाषा सतत तुमच्या कानावर पडते. पण असं जरी असलं, तरी मध्यांतरापर्यंत चित्रपट खूप ताणला गेला आहे. जत्रेतला लेझीमचा सीन, बबनचं कोमलच्या मागे फिरणं, मारामाऱ्या हे प्रसंग थोडक्यात दाखवता आले असते. मात्र या दृष्यांमुळे चित्रपट ताणला गेला आहे.



चित्रपटाची कथा उत्तम आहे. कथेला मिळालेली गाण्यांची जोडही कथेला साजेशी आहेत. मात्र, गरजेपेक्षा जास्त गाण्यांच्या भरण्यामुळे प्रेक्षक कंटाळू शकतो. चित्रपटात प्रत्येक सिच्युएशनवर गाणं आहे. अनेक गाणी ऐकायला जरी छान वाटतं असली, तरी सतत येणारी गाणी नंतर नंतर नकोशी होतात.



चित्रपटातल्या प्रत्येक व्यक्तीरेखेने आपली भूमिका उत्तम वठवली आहे. ख्वाडा' सिनेमामध्ये भाऊसाहेब शिंदे यांची आपल्यासमोर एक रांगडा अभिनेता म्हणून ओळख होती. 'बबन'मध्ये तेच भाऊसाहेब शिंदे रोमान्स करताना दिसतात. बबनच्या वडिलांचं काम केलेल्या भाऊराव शिंदे यांनीही त्यांचं पात्र समोर उभं केलं आहे. बबनची हिरोईन अर्थात कोमल म्हणजेच गायत्रीचा हा तसा पहिलाच चित्रपट. पण तिच्या अभिनयाकडे पाहून ती पहिल्यांदाच अभिनय करत असल्याचं जाणवत नाही.



जर तुम्ही 'ख्वाडा' बघून त्या अपेक्षेने बबन बघायला गेलात तर तुमचा अपेक्षाभंग होण्याची जास्त शक्यता आहे. पण जर तुम्हाला ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर मात्र बबन जरूर बघा!




Movie - Baban

Actors - Bhausaheb Shinde, Gayatri, Bhaurao Shinde

Rattings - 2.5/5


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा