संदीप कुलकर्णीसारखा वेगळ्या भूमिका साकारणारा अभिनेता जेव्हा एखाद्या चित्रपटात दिसणार असतो, तेव्हा त्या चित्रपटाची चर्चा होणं स्वाभाविक ठरतं. सध्या ‘कृतांत’ या आगामी मराठी चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये असलेल्या संदीपच्या या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘रेनरोज फिल्म्स’अंतर्गत निर्माते मिहीर शाह यांची निर्मिती असलेला ‘कृतांत’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वा सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता.
अभिनेता संदीप कुलकर्णीच्या हटके लूकची यावेळी बरीच चर्चा झाली होती. आता ‘कृतांत’चा मोशन टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये केवळ ‘काहीतरी घडलं होतं...’ असं म्हणत चित्रपटाचं शीर्षक आहे. त्यासोबतच ‘कृतांत’शी निगडीत असलेल्या कलाकार-तंत्रज्ञांच्या नावांचाही समावेष आहे.
यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेला या चित्रपटातील संदीपचा लुक उत्सुकता वाढवणारा असून, नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या टीझरमधील ‘काहीतरी घडलं होतं...’ ही ओळ उत्सुकता आणखी वाढवणारी आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनातील तात्विकतेचा संबंध अधोरेखित करण्यात आला आहे. संदीपच्या जोडीला या सिनेमात सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांच्या भूमिका आहेत. विजय मिश्रा या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे. दत्ताराम लोंढे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.