Advertisement

सीमारेषेच्या पलिकडे न गेलेला षटकार

दिग्दर्शक शिवदर्शन साबळेने ‘लगी तो छगी’ या सिनेमाच्या रूपात काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला असला तरी तो पूर्णपणे यशस्वी झालेला नाही.

सीमारेषेच्या पलिकडे न गेलेला षटकार
SHARES

आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं असं सर्वांनाच वाटत असतं. सर्वजण तसा प्रयत्नही करतात, पण फार कमी जणांना त्यात यश मिळतं. दिग्दर्शक शिवदर्शन साबळेने ‘लगी तो छगी’ या सिनेमाच्या रूपात काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला असला तरी तो पूर्णपणे यशस्वी झालेला नाही.

या सिनेमाची कथा आहे आलाप सहस्रबुद्धे (अभिजीत साटम) आणि त्याच्या संपर्कात जाणते-अजाणतेपणे येणाऱ्या बऱ्याच जणांची... बंटी (रवींद्रसिंग बक्षी) नावाच्या मित्रासोबत राहणाऱ्या आलापला स्वत:चं कार शोरूम उघडायचं असतं, पण पैसे नसल्याने त्याची गाडी अडकलेली असते. क्रिकेटवर सट्टा लावणारा बंटी आलापलाही सट्टा लावायला सांगतो. दोघांनीही उंगली शेट्टीकडून (मिलिंद उके) पैसे घेतलेले असतात. ते वसूल करण्यासाठी उंगली त्यांच्या मागे लागलेला असतो.

दुसऱ्या एका ट्रॅकमध्ये अंमली पदार्धांची विक्री करणारा जॅानी (सागर आठलेकर) सुखरूपपणे आपला धंदा करत असतो. पठाण (सुरेंद्र पाल) या धंद्यातील मोठा मासा. यांसारख्या लहान-मोठ्या माशांना पकडून अंमली पदार्धाचा धंदा नेस्तनाबूत करण्याचा एसीपी सुरभी म्हापसेकरचा (निकीता देवधर) प्रयत्न असतो. या खेळात शेवटी काय होतं ते वेगळं सांगण्याची गरज नाही.



एखादी चवदार रेसीपी बनवण्यासाठी सर्व मसाले सम प्रमाणात असावे लागतात. ‘लगी तो छगी’रूपी रेसीपीत कुठेतरी काहीतरी कमी, तर कुठेतरी काहीतरी जास्त झाल्याने पूर्ण मजाच निघून जाते. सुरुवातीची १५-२० मिनिटं काहीतरी वेगळं पाहात असल्यासारखं वाटतं, पटकथेची मांडणी, व्यक्तिरेखांचं सादरीकरण आणि धडाकेबाज एंट्री यामुळे नक्की हा मराठी सिनेमाच आहे ना? असा प्रश्न मनात येतो. पण हा आनंद फार काळ टिकत नाही. कारण या सिनेमात इतक्या व्यक्तिरेखा आहेत की त्यांची ओळख करून देण्यातच बराच वेळ गेला आहे. पुढे पुढे तर आता या व्यक्तिरेखांना आवरा असं म्हणावंसं वाटतं.

सिनेमातील आजच्या काळातील संवाद तरुणाईला भावणारे आहेत. दिग्दर्शक या नात्याने शिवदर्शनने या सिनेमाला एक वेगळी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला आहे, पण दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या शैलीतील काहीतरी देण्याच्या नादात सिनेमाचं नुकसान झालं आहे. व्यक्तिरेखांचा पसारा आणि त्यांची ओळख करून देण्याचा व्याप खूप वाढवल्याने सिनेमा पाहण्यातील गंमतच निघून जाते.



तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा चांगला आहे. पण पटकथेची मांडणी आणि व्यक्तिरेखांच्या घोळामुळे सर्वांची भेळ झाली आहे. सिनेमाचा वेग आणि त्या वेगाशी जुळवून घेत कलाकारांनी केलेल्या अभिनयाचं कौतुक करावं लागेल. संकलनात ढिलाई जाणवते. कॅास्च्युम, वेशभूषा, रंगभूषा, बोलीभाषा, सादरीकरण हे या सिनेमाचे प्लस पॅाइंट्स आहेत. गीत-संगीताची बाजू कमकुवत आहे.



कलाकारांचा अभिनय ही जमेची बाजू असली तरी मुख्य भूमिकेतील अभिजीत साटमने घात केला आहे. याउलट मिलिंद उकेने साकारलेला उंगली शेट्टी स्मरणात राहण्याजोगा आहे. यासोबतच निकीता देवधरने साकारलेली सुरभीही दमदार आहे. रवींद्रसिंग बक्षीचा बंटी आणि सागर आठलेकरचा जॅानीही छान झाला आहे. सुरेंद्र पाल यांची भूमिका छोटी असली तरी त्यांनी ती नेटकेपणाने साकारली आहे. यांच्या जोडीला योगेश सोमण, शैला काणेकर, असित रेडीज आदी कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.

थोडक्यात काय तर या सिनेमाला काहीशी वेगळी ट्रीटमेंट देत शिवदर्शनने षटकार मारण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो सीमारेषेच्या पलिकडे जाऊ शकलेला नाही.

दर्जा : ** 1/2


सिनेमा: लगी तो छगी

निर्माते : शिवदर्शन साबळे, स्वाती फडतरे, अजित पाटील

दिग्दर्शक : शिवदर्शन साबळे

कलाकार : अभिजीत साटम, रवींद्र सिंग बक्षी, निकिता गिरीधर, मिलींद उके, सुरेंद्र पाल, योगेश सोमण, महेश सुभेदार, अक्षय भोसले, सागर आठल्येकर, शैला काणेकर, असित रेडीज, राजू बावडेकर



हेही वाचा-

प्रेक्षकांना 'मस्का' लावण्याचा चांगला प्रयत्न



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा