चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग केले जातात. कधी चित्रपटात, तर कधी प्रमोशनसाठी निरनिराळे फंडे वापरून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जातो. आता 'बंदिशाळा' या चित्रपटाचे संगीतमय प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका असलेल्या 'बंदिशाळा' या आगामी मराठी चित्रपटानं यंदाच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांवर आपली विशेष छाप सोडली आहे. त्यामुळं संजय कृष्णाजी पाटील लिखित व मिलिंद लेले दिग्दर्शित 'बंदिशाळा' या चित्रपटात नेमकं काय दडलंय हे पाहण्याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे. या आधी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मुक्ताचं डॅशिंग रूप दिसलं आहे. त्यामुळं आजवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारणाऱ्या मुक्ताचं या चित्रपटात एक रौद्र रूपही पहायला मिळणार याची चाहूल लागली आहे.
नुकतेच प्रदर्शित झालेले या चित्रपटाचे संगीतमय प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणणारे आहेत. चित्रपटाचं लेखन करणाऱ्या पाटील यांनीच गीतलेखनही केलं आहे. संगीतकार अमितराजनं ही गीतं वैशाली सामंत, प्रियांका बर्वे, आरोही म्हात्रे, आरती केळकर व स्वतःच्या आवाजात स्वरबद्ध केली आहेत. या चार गाण्यांच्या अल्बमचं प्रकाशन कलावंत-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत करण्यात आलं. 'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवास' या गाजलेल्या चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते तसंच 'दशक्रिया' चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पाटील यांनी एका सत्य घटनेचा आधार घेऊन बंदिशाळाचे कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन केलं आहे.
बंदिशाळा हा एक सामाजिक विषयावरील महत्वाकांशी चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकाऱ्याची कथा या चित्रपटातून उलगडणार असून ही भूमिका आणि हा वेगळा विषय मुक्तानं आपल्या अभिनयाच्या बळावर एका वेगळ्याच उंचीवर पोहचवला आहे. तिनं या चित्रपटात माधवी सावंत ही महिला तुरुंग अधिकारी साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मुक्तानं तब्बल १० वर्षानंतर पाटील यांच्यासोबत काम केलं आहे.
या चित्रपटात मुक्तासोबत विक्रम गायकवाड, शरद पोंक्षे, हेमांगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अश्विनी गिरी, अजय पुरकर, माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, लक्ष्मीकांत धोंड, अनिल राबाडे, उमेश बोलके, अनिल नगरकर आणि उमेश जगताप यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटानं यंदा महाराष्ट्र राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक - २, सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती - शांताई मोशन पिक्स्चर्स (स्वाती संजय पाटील), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुक्ता बर्वे, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका प्रियांका बर्वे, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत विजय गवंडे, सर्वोत्कृष्ट गीतकार संजय कृष्णाजी पाटील, सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक नरेंद्र हळदणकर अशा तब्बल ७ सर्वाधिक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.
हेही वाचा -
...आणि किशोरी शहाणेंना अनावर झाले अश्रू
ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन