Advertisement

मृणालच्या 'वेलकम होम'चा ट्रेलर पाहिला का?

प्रत्येकाचं घराविषयी आपलं एक मत असतं, पण एका स्त्रीच्या मनातील घर कसं असतं, सासरचं की माहेरचं, पतीचं की मुलाचं... यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उकल या चित्रपटात करण्यात आली आहे.

मृणालच्या 'वेलकम होम'चा ट्रेलर पाहिला का?
SHARES

अभिनयासोबतच दिग्दर्शनातही यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणालची मुख्य भूमिका असलेल्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे.


१४ जूनला प्रदर्शित

'घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तरंही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाच्या माध्यमातून लाँच करण्यात आला आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्येकाचं घराविषयी आपलं एक मत असतं, पण एका स्त्रीच्या मनातील घर कसं असतं, सासरचं की माहेरचं, पतीचं की मुलाचं... यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उकल या चित्रपटात करण्यात आली आहे.


उत्तम स्टारकास्ट

या चित्रपटात मृणाल कुलकर्णीसोबत सुमित राघवन प्रथमच एक मुख्य भूमिका साकारत आहे. यापूर्वी मृणाल आणि सुमित यांनी 'होम स्वीट होम' या चित्रपटात एकत्रितपणे एक छोटीशी भूमिका साकारली होती. या दोघांसोबत स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी उत्तम स्टारकास्ट आहे.


जातकुळी वेगळी 

आजवर सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी बरेच चित्रपट केले असले, तरी हा चित्रपटाची जातकुळी काहीशी वेगळी असल्याचं या ट्रेलरवरून जाणवतं. त्यामुळेच या चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण होतं. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे.

लिंक - https://www.youtube.com/watch?v=fGJrEXITb9Y&feature=youtu.be



हेही वाचा  -

तिसऱ्या दिवशी अभिजित आणि रुपाली झाली भावूक

३ जूनला रंगणार प्रायोगिक नाट्य महोत्सव; अरुण नलावडे आणि निर्मिती सावंत यांना पुरस्कार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा