दरवर्षाप्रमाणे यंदाही भारतातर्फे आॅस्करसाठी अधिकृतपणे कोणता सिनेमा पाठवण्यात येईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आता या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून, ‘पद्मावत’, ‘पॅडमन’, ‘राजी’ या हिंदी सिनेमांसह चर्चेत असलेल्या ‘न्यूड’, ‘बोगदा’ आणि ‘गुलाबजाम’ या सिनेमांवर मात करत राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘व्हिलेज रॅाकस्टार्स’ या आसामी सिनेमाची आॅस्कर दरबारी वर्णी लागली आहे.
'फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'च्या निवड समितीने ऑस्करसाठी 'व्हिलेज रॉकस्टार्स'ची अधिकृत निवड झाल्याचं जाहीर केलं. ‘व्हिलेज राॅकस्टार्स’ या सिनेमात दिग्दर्शिका रीमा दास यांनी खेडेगावातील गरीब मुलांची कथा मांडली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ही मुलं जीवनाचा आनंद कसा उपभोगतात याची मनमोहक कथा या सिनेमात आहे.
या मुलांनी बनवलेल्या रॅाक बँडचं चित्रण रीमा यांनी काहीशा मिश्कील शैलीत केलं आहे. अतिशय कमी बजेटमध्ये हा सिनेमा बनवून रीमा कौतुकास पात्र ठरल्या आहेत. या सिनेमाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ४४ हून अधिक पुरस्कारांवर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं आहे.
यंदा आॅस्करसाठी संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या ‘पद्मावत’ या सिनेमासोबतच अक्षय कुमारचा ‘पॅडमन’ आणि आलिया भट्टच्या ‘राजी’ची चर्चा होती. भारताच्या वतीने एकूण २९ सिनेमे आॅस्करच्या शर्यतीत होते, पण या सर्वांवर मात करत ‘व्हिलेज रॅाकस्टार्स’ने बाजी मारली. हिंदीमध्ये ‘आॅक्टोबर’, ‘लव्ह सोनिया’, ‘मंटो’, ‘१०२ नॅाट आऊट’, ‘हिचकी’ या सिनेमांचाही समावेश होता.
प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चेत असलेला ‘न्यूड’, ‘बोगदा’ आणि ‘गुलाबजाम’ या मराठी सिनेमांकडूनही अपेक्षा होती. ‘रेवा’ आणि ‘बेस्ट आॅफ लक लालू’ या गुजराती सिनेमांच्या जोडीला ‘टू लेट’ आणि ‘कोलामऊ कोकीला’ हे तमिळ सिनेमेही आॅस्करच्या शर्यतीत होते.