गीतकार गुरू ठाकूरच्या गाण्यांवर प्रेम करणाऱ्या संगीतप्रेमींची संख्या आज खूप मोठी आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळापासूनच मराठी शब्दप्रधान गीतरचनांना प्राधान्य देत रसिकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण करणारा गुरू आता पार्श्वगायक बनला आहे.
मागील काही वर्षांपासून गीतकार गुरू ठाकूर हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेरही चांगलंच गाजत आहे. गुरूने लिहिलेलं एखादं गाणं अमेरिकेतील रेडिओ स्टेशनवर वाजणं आणि तिथल्या मराठी बांधवांनी ताल धरणं ही मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब आहे. मराठी शब्दांवर प्रभुत्व असल्याने रसिकांचा आवडता गीतकार बनलेला गुरू आता पार्श्वगायनाकडे वळला आहे. ‘कृतांत’ या आगामी मराठी सिनेमासाठी गुरूने पार्श्वगायन केलं आहे.
कृतांत’ हा आगामी सिनेमा गुरूच्या पार्श्वगायनामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. यापूर्वी या चित्रपटाने संदीप कुलकर्णीच्या काहीशा हटके गेटअपमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन दत्ता भंडारे या नवोदित दिग्दर्शकाने केलं आहे. गीतलेखनापासून पटकथालेखनापर्यंत लेखनाच्या सर्वच बाजू शैलीदारपणे मांडणा-या गुरूने या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच सिनेमातील नवं कोरं गीत गायलं आहे.
कोणत्याही गीतकारासाठी गायन ही नवखी गोष्ट नसतेच. काव्यवाचनासाठी जो लहेजा लागतो त्या आधारे गीतकार सहजपणे गायनही करू शकतो. याच न्यायाने गुरूनेही यापूर्वा स्टेजवर परफॉर्म करत एखाद दुसरं गीत गात रसिकांची दाद मिळवली आहे, पण सिनेमासाठी पार्श्वगायन करण्याची गुरूची ही पहिलीच वेळ आहे. या सिनेमाचं प्रमोशनल साँग गुरूच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. गुरूने स्वतःच हे गीत लिहिलं आहे. “थांब, किंचित थांब...’’ असा मुखडा असलेल्या या गीताला संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिलं आहे.
पार्श्वगायनाचा हा पहिला वहिला अनुभव बरंच काही शिकवणारा असल्याचं मत व्यक्त करीत गुरू म्हणाला की, ‘कृतांत’ या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा आहे. अशा प्रकारच्या सिनेमाच्या निमित्ताने पार्श्वगायनात पदार्पण करण्याची संधी मिळाली हे खूप महत्त्वाचं मानतो. आम्ही हे ठरवून केलं नसून, प्रथम मी गीतलेखन केलं आणि नंतर अगदी सहजपणे पार्श्वगायन करण्याचाही योग जुळून आला. रसिकांना हे गीत नक्कीच आवडेल अशी आशाही गुरूने व्यक्त केली.
‘कृतांत’ची कथा वर्तमान काळातील लाईफस्टाइलवर भाष्य करणारी आहे. जगण्याच्या तत्त्वज्ञानाची आजच्या जीवनशैलीशी अचूक सांगड घालत दत्ताने एक असं कथानक लिहिलं आहे, जे आजच्या पिढीतील सर्वांनाच आपलं प्रतिबिंब दाखवणारं ठरेल. या चित्रपटात संदिप कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन यांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा -
सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या ८५ अनाथ मुलांना मदत
निवेदिता सराफ साकारणार ‘रानीदेवी’