कल्याणमध्ये परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना मुंब्रा येथे परप्रांतीय फळविक्रेत्यांनी मराठी तरुणाला माफी मागायला लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मनसेने निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे ठाणे प्रमुख अविनाश जाधव यांनी मात्र या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्रात मराठी बोलणे हा आता गुन्हा आहे" असे म्हणत जाधव यांनी या घटनेचा निषेध केला. त्यानंतर अशा घटना अधून मधून घडत राहतील आणि मराठी जनता बघतच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठीत बोल असे सांगितल्याने परप्रांतीय फळविक्रेता भडकला. या परप्रांतीय फळविक्रेत्यांने तरुणाला कान धरून माफी मागायला लावल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंब्रा येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्रात राहायचे असेल तर तुला मराठीत बोलावेच लागेल, असा आग्रह या तरुणाने धरला. पण त्याची शिक्षा म्हणून त्याला चक्क हिंदी भाषेतून माफी मागायला भाग पाडण्यात आले.
सर्वात कहर म्हणजे मुंब्रा पोलिसांनी मराठी तरुणाची बाजू न घेता परप्रांतीय फळविक्रेत्यांच्या तक्रारीवरून त्याच्यावरच अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. नाव विशाल गवळी असे मराठी तरुणाचे नाव आहे. मराठीवरील अन्याय आणखी किती दिवस सहन करणार, असा सवाल विचारण्यात येत आहे.
परप्रांतीय फळविक्रेता शोएब कुरेशी याचे साथीदार तातडीने जमा झाले आणि मराठमोळया विशालला अक्षरश: घेरले. तसेच त्याला दमबाजी केली आणि धारेवर धरले. काही जणांनी तर विशाल याला शिवीगाळ देखील केली. अखेर त्याला फळविक्रेत्यांनी कानाला धरून हिंदीत माफी मागायला भाग पाडले. ही बाचाबाची समजताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा