लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वातआधी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती. परंतू, उत्तर मुंबईतील उमेदवाराची घोषणा केली नव्हती. मात्र, काँग्रेस पक्ष बुधवारी उत्तर मुंबईतील उमेदवाराची घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत असून ही उमेदवारी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरची बुधवारी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीसाठी उर्मिलाला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाळ शेट्टी उमेदवार आहे. तसंच, शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस एका तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. त्यामुळं सध्या काँग्रेस शेट्टी यांच्याविरोधात उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचारात आहे. त्याशिवाय, उत्तर पश्चिम मुंबईतून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांना उमेदवारी मिळणार असल्य़ाची शक्यता वर्तवली जात आहे.