नरिमन पॉईंट - मुंबई महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. मनसे, काँग्रेस राष्ट्रवादीला मुंबईत हवंतसं यश मिळालेलं नसल्यामुळे मुंबई शहर काँग्रेस कार्यालय आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.
निकाल कळताच मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी देखील राजीनामा दिला. मुंबईत काँग्रेसने 2012 मध्ये 52 जागांवर विजय मिळवला होता, तो आकडा घसरून 2017 च्या पालिका निवडणुकीत 31 जागांवर आला आहे. 2012 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 उमेदवार विजयी झाले होते. मात्र आता अवघ्या 9 जागा त्यांना मिळाल्या. मनसेला मागील महापालिका निवडणुकीत 28 जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यांच्या आता 7 जागा आल्या.
या तीनही राजकीय पक्षांना मुंबईकरांनी नाकारले असून, आगामी निवडणुकीत हे राजकीय पक्ष कोणता अजेंडा घेऊन पुढे येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.