अनधिकृत बांधकामांविषयी माहिती असताना दुर्लक्ष केलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी पालिकेला अहवालासाठी १५ दिवस म्हणजे सेटलमेंटसाठी वेळ दिला असल्याचं म्हणत नितेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला. अजूनही मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक होत असून पुढेही कारवाई होणार नाही याचे हे सूचक असल्याचा आरोप त्यांनी केला.
आरोप प्रत्यारोप न करता भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, म्हणून याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशीची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
बाळा खोपडे नावाचा व्यक्ती पालिका परिसरात फिरत असून तो हॉटेल रेस्टोरंटसाठी लागणाऱ्या परवानग्या आमदार अधिकाऱ्यांशिवाय मिळवून देतो. सगळ्यांचे रेटकार्ड त्याच्याकडे आहेत. त्याला पकडून दाखवले आणि कारवाई झाली तर प्रशासनाचा जाहीर सत्कार आपण करू, असे आवाहन नितेश राणे यांनी पालिका प्रशासनाला केले.
'मोजोस बिस्ट्रो'चे खरे शेअर होल्डर कोण आहेत? यात कुणाची भागीदारी आहे? हे सगळं कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असे प्रश्न विचारत यावर शिवसेना गप्प का? असा प्रश्न त्यांनी विचारला. मुंबईकर करदाते आहेत, मात्र ते संध्याकाळी घरी पोहोचतील की नाही? याची शाश्वती नसते. मुंबईकरांच्या मागे ठाकरेंसारखं मोठं नाव नाही, म्हणून त्यांना सुरक्षित राहण्याचा अधिकार नाही का? असा टोलाही त्यांनी लगावला.
'माझा पॉलिसीला विरोध नाही, नियम पाळून अंमलबजावणी आवश्यक असल्याचं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं. उद्या 'आदित्य ठाकरेंच्या पॉलिसीला नितेश राणेंचा विरोध' अशी हेडलाईन नको, असं सांगत नियम तपासून पाहा, त्याची अंमलबजावणी करा' असा सल्ला त्यांनी दिला. १५ जानेवारीला पालिकेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती देत याला स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.