Advertisement

वायफळ खर्चावर निवडणूक आयोगाची करडी नजर


वायफळ खर्चावर निवडणूक आयोगाची करडी नजर
SHARES

मुंबई - महापालिका निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांच्या वायफळ खर्चाला निवडणूक आयोगाने चाप लावल्यामुळे आता प्रचाराचा आवाजच दाबला गेलाय. उमेदवारांच्या प्रचार फेरीत वापरले जाणारे झेंडे आणि फलक तसेच उपरणी यांच्यासाठीच पैसा आकारला जात आहे. एवढेच नव्हे, पाण्याच्या बॉटल्स आणि ग्लास यासाठीचा खर्चही निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे प्रचार करायचा तरी कसा? असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत 227 प्रभागातून 2 हजार 271 उमेदवार उभे आहेत. या उमेद्वारांना निवडणूक खर्च म्हणून 5 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. परंतु हा निवडणूक खर्च करताना विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या वेळी निवडणूक प्रचार करताना निवडणूक अधिकाऱ्यांचा जागता पहारा सुरू आहे. त्यामुळे उमेदवाराच्या प्रचार फेरीत वापरले जाणारे झेंडे, गमछा (उपरणी), पाण्याची व्यवस्था यासह अन्य वापराची नोंद निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतली जाते. यासर्व साहित्यांची नोंद घेऊन अधिकारी हा खर्च निवडणूक खर्चात नमूद करत आहेत.

पश्चिम उपनगरातील शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, "उमेदवाराच्या एका प्रचार फेरीसाठी एक झेंडा वापरल्यास त्यासाठी 570 रुपये खर्च लावला जातो. त्यामुळे केवळ 2 झेंडेच वापरले जातात. तर साधे पाणीही आम्ही कार्यकर्त्यांना देत नाही आहोत. जर पाणी दिले तर त्याचाही खर्च अधिकारी लावतात. बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांनी स्व:खर्चाने पाण्याच्या बॉटल्स खरेदी करतात तरी त्याचीही नोंद निवडणूक अधिकारी घेत असतात म्हणून प्रचार फेरीत आम्ही पाणीही देत नाही." निवडणूक अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिला आहे.

महापालिका निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कलनिर्धारण-संकलन विभागाचे अधिकारी संजोग कॅबरे यांनी या वेळी निवडणूक खर्चावर अधिकाऱ्यांची करडी नजर असल्याचे सांगितले. आयोगाने जे शुल्क निश्चित केले आहे तेच आकारले जात आहे. उमेदवार प्रचार फेरीत जे जे साहित्य वापरत आहेत त्याची नोंद दरदिवशी घेतली जात आहे. त्याप्रमाणे सर्व दिवसाचा खर्च उमेदवाराच्या खर्चात दाखवला जाईल असे कबरे यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा