कथित बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मुंडे यांच्या मेव्हणीने तक्रार मागे घेतली असली, तरी आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने थेट मुंबई पोलीस आयुक्तालयात जाऊन त्यांच्याविरोधात लेखी तक्रार केली आहे. मागील ३ महिन्यांपासून धनंजय मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा यांनी आपल्या वकिलासोबत पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे. सोबतच मुलांना भेटण्यास दिलं नाही, तर २० फेब्रुवारीला आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांना (mumbai police) दिलेल्या लेखी तक्रारीत करुणा यांनी म्हटलं आहे की, माझ्या नवऱ्याविरोधात भादंवि कलम ३७६, ३७७, ४२०, ४७१, ३२४, ५०६ (२), घरगुती हिंसाचार कायदा कलम १८, १९ आणि आयटी अॅक्ट दाम्पत्य अधिकार कलम ९ अन्वये तक्रार केली आहे.
हेही वाचा- धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराचा आरोप मागे
माझ्या दोन मुलांना धनंजय मुंडे यांनी गेल्या ३ महिन्यांपासून आपल्या बंगल्यात डांबून ठेवलं आहे आणि त्यांना भेटू देत नाही. इतकंच नव्हे, तर फोनवर बोलू देखील देत नाही. २४ जानेवारीला चित्रकूट बंगल्यावर मुलांना भेटायला चित्रकूट बंगल्यावर गेले असता धनंजय मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांनी बोलावून मला मुलांना भेटण्यास मज्जाव केला.
बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नसून मुलांमध्ये १४ वर्षीय मुलगीही आहे. मात्र तिच्यासाठी कोणी केअरटेकरही नाही, असं सांगतानाच मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करत असल्याचा गंभीर आरोपही करुणा यांनी केला आहे. माझ्या मुलांसोबत काही चुकीचं झाल्यास त्याला धनंजय मुंडे जबाबदार असतील असंही त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.
सोबतच, मला माझ्या मुलांना भेटू दिलं गेलं नाही, तर मी २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहे. उपोषणासाठी करूणा यांनी चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करण्याची परवानगीही मागितली आहे. तसंच धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
(karuna sharma files complaint against dhananjay munde in mumbai police)