हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर बाॅलिवूडमध्ये प्रचंड (mns chief raj thackeray speaks on bollywood actor sushant singh rajput suicide controversy) वाद उसळलेला आहे. शोषणकर्ते आणि शोषित कलाकारांमध्ये सोशल मीडियावरून दिवसागणिक चकमकी उडत आहेत. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
सुशांतसिंग राजपूत याने १४ जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चांना उधाण आलं. हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाहीमुळे कलाकारांचं कसं शोषण होतं, यावर आरोप-प्रत्यारोप व्हायला लागले. करण जोहर, सलमान खान, यशराज फिल्म, संजय लिला भन्साळी अशी अनेकांची नावं या वादात घेण्यात आली. कंगणा रणौत ते इजाज खानपर्यंत अनेकांनी सुशांतसिंग याला दबावामुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं असल्याचा दावा केला.
हेही वाचा - संजय लिला भन्साळीच्या अडचणीत वाढ, सुशांत आत्महत्येप्रकरणी बोलवले चौकशीला
#राजठाकरे #मनसेभूमिका #HindiFilmIndustry #SushantSinghRajput #MNS #RajThackeray pic.twitter.com/pUD1boTnSO
— Raj Thackeray (@RajThackeray) July 4, 2020
त्यातच टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यावरही कलाकारांच्या शोषणाचे आरोप होत असताना आतिफ अस्लमच्या गाण्यावरून मनसेने टी सीरिजला दणका दिला. तेव्हापासून कलाकारांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा, अशाप्रकारच्या बातम्या पसरत गेल्या. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत भूमिका मांडली आहे.
आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात की, सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला गेला. या वादाच्या अनुषंगाने ‘यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा’ अशा आशयाच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारीत झाल्या.
मी इथं स्पष्ट करू इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.