राज्यातल्या विविध माध्यमांच्या शाळेतील मुलांना मराठी नीट लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात मराठी हा विषय सक्तीचा करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात लावून धरली.
'मला कुणाचा अपमान करायचा नाही. परंतु, सभागृहातील काही सदस्यांनाही मराठी नीट येत नाही', असे सांगत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. मराठी भाषा टिकण्यासाठी हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा निर्णय घेतला तरच मराठी भाषा टिकेल, असं मत त्यांनी सभागृहात मांडलं. मराठी भाषा विषयक ठरावावर बोलताना अजित पवार यांनी ही मागणी लावून धरली.
विधान परिषदेत विरोधकांनी केंद्र सरकारच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याची मागणी लावून धरली. भाजपा नेते भाई गिरकर यांनीही याविषयी प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षाकडून सुनील तटकरे, हेमंत टकले यांनीही या मागणीला पाठिंबा दिला.
यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 'सदर प्रस्ताव आपण त्या-त्या शिक्षण मंडळाला सादर करू. त्यावर संबंधित शिक्षण मंडळ सगळ्या बाबींचा विचार करून योग्य ते निर्णय घेईल', असं उत्तर दिलं.
हेही वाचा
आपुल्याच घरात हाल सोसते मराठी..!