नरिमन पॉईंट -नोट बदलामुळे देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलीय. त्यातच मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रचारात रत्नागिरीमध्ये केलेलं विधान धक्कादायक आणि असंवेदनशील असल्याचही ते यावेळी म्हणालेत. पेन अर्बन बँकेच्या जमिनी सिडको विकत घेईल, मुख्यमंत्र्यांच्या या विधानाची निवडणूक आयोग दखल का घेत नाही? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
सत्ताधारी देशभक्तीचा केवळ देखावा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नागरिकांच्या व्यथा मांडणे म्हणजे देशाच्या विकासाला विरोध करणे आहे का? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. जिल्हा बँकांवरील निर्बंध टाकत सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. लोकमंगल सोसायटीची मिळालेली रक्कम हा काळा पैसा असल्याचं त्यांनी म्हटलंय. जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी सोपवत मुख्यमंत्री मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सावंत म्हणालेत. तसेच कोल्ड प्लेमुळे महाराष्ट्राचा काय फायदा झाला याचा अहवाल सरकारकडे मागणार असल्याचे सावंत यांनी सांगितलं.