वडाळा - प्रभाग क्रमांक 178 मध्ये युवासेना अध्यक्ष आदीत्य ठाकरे यांचा उजवा हात असलेल्या युवासेना पदाधिकारी अमेय घोले याला उमेदवारी दिल्याने शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झालेत. स्थानिक नागरिकांसह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 178 मधील शिवसेना शाखेला टाळे ठोकले. जोपर्यंत योग्य व्यक्तीस उमेदवारी देण्यात येत नाही तोपर्यंत शाखा बंद ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोणत्याही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यास उमेदवारी देणार नसल्याचे सांगितले होते. तरीही वडाळ्यातील प्रभाग क्रमांक 178 मधून काम करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांना डावलून अमेय घोले याला उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोण अमेय घोले? कसा दिसतो? त्याला आम्ही पाहिलेले नाही असे एक ना अनेक प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित करत संधीसाधू उमेदवाराला शिवसेनेतून तिकीट कसं काय मिळू शकत असा सवाल कार्यकर्त्यांनी विचारला.