वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला मानला जातो. उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली.
या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनीही मोठा विजय मिळवला. मात्र, शिवसेना फुटल्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेचा (ठाकरे) प्रभाव काहीसा कमी झाला आहे.
हा मतदारसंघ लोकसभेच्या दक्षिण मुंबई मतदारसंघांतर्गत येतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेच्या (ठाकरे) मतांची टक्केवारी घटल्याचे दिसून आले.
तर दुसरीकडे महायुतीसह मनसेने वरळीत चाचपणी सुरू केल्याने आदित्य ठाकरे सावध झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते.
उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडल्यापासून शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला खिळखिळा करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. या विभागात वेगवेगळे कार्यक्रम आखून भाजपने पद्धतशीरपणे मराठी माणसांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
वरळीच्या मध्यवर्ती भागातील जांबोरी मैदानात दहीहंडीचे कार्यक्रम, मराठी दांडियाचे कार्यक्रम पार पडले.
तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अलीकडेच वरळीतील दोन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे) अरविंद सावंत निवडून आले.
पण या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी त्यांना वरळीतून सर्वात कमी सहा हजार मतांनी विजय मिळाला. आदित्यसाठी हा मोठा धक्का असून त्याच्यासमोर मोठे आव्हान आहे.
वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे?
शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वरळी लोकसभेत कमी झालेले मताधिक्य आणि बदललेली राजकीय समीकरणे हे आदित्य ठाकरेंसाठी आव्हान असेल. मात्र, आदित्य ठाकरेंसमोर महायुती कोणता उमेदवार उभा करणार हे अद्याप ठरलेले नाही.
महायुतीला आदित्य ठाकरे यांचा पराभव करायचा असेल तर त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार उभे करणे आवश्यक आहे. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा असलेल्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनाही रिंगणात उतरविण्याचा विचार महायुती करत आहे.
अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र असून ते आदित्य ठाकरे यांचे चुलत भाऊही आहेत. महायुतीने यापूर्वी बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला होता. असाच प्रयत्न वरळीतही होऊ शकतो.
महाविकास आघाडीत ठाकरे गटाला वरळीची जागा मिळणार हे जवळपास निश्चित झाले असून आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे) वरळी मतदारसंघासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
वरळी विधानसभेचे माजी आमदार
1962- माधव नारायण बिर्जे (काँग्रेस)
1967- माधव नारायण बिर्जे (काँग्रेस)
1972- शरद शंकर दिघे (काँग्रेस)
1978- प्रल्हाद कृष्ण कुरणे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) (मार्क्सवादी)
1980- शरद शंकर दिघे (काँग्रेस)
1985- विनिता दत्ता सामंत (अपक्ष)
1990, 1995, 1999, 2004 – दत्ताजी नलावडे (शिवसेना)
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर
2009 – सचिन अहिर (राष्ट्रवादी काँग्रेस)
2014 – सुनील शिंदे (शिवसेना)
2019 – आदित्य ठाकरे (शिवसेना)
हेही वाचा
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ: सिद्दीकी राष्ट्रवादीत दाखल