ज्या मिठी नदीमुळे पावसाळ्यात मुंबईकर हैराण होतात ती मिठी नदी पुढील 100 वर्ष तुंबणार नाही, असा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी केला. मिठी नदीच्या खोलीकरणाचे आणि रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून, पुढील शंभर वर्षासाठी मिठी नदी पूर आणि पावसापासून सुरक्षित असल्याची माहिती खुद्द पर्यावरण मंत्र्यांनी दिली आहे.
मंत्रालयात मंगळवारी मिठी नदीच्या कामकामाबाबत रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप-जिल्हाधिकारी सतीश बागल, एमएमआरडीएचे प्रकल्प संचालक एस. सी. देशपांडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. सोनटक्के, मधुकर लाड आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वीची मिठी नदी संदर्भातील सर्व स्वच्छतेची कामे झाली असून, पुढील कामांची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील सादरीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी केले.
मिठी नदी परिसरातील 12 हजारांपैकी 10 हजार झोपड्या हटवण्यात आल्या असून, उर्वरित झोपड्या हटवण्याचे काम तातडीने करावे, असे निर्देश रामदास कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मिठी नदी मुंबई शहरातील एक उल्लेखनीय पर्यटन स्थळ करण्यासंदर्भात शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही आश्वासनही रामदास कदम यांनी दिले. याचबरोबर मुंबईतील पोयसर, दहीसर आणि ओशिवरा नद्यांचा स्वच्छताकरण प्रस्ताव तातडीने सादर करून, त्यासंदर्भातील कामांनाही गती देण्यात यावी असेही त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना सांगितले.