मुंबई - रायपूर येथील वीर नारायण सिंग स्टेडियममध्ये हैदराबादविरुद्ध झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईच्या संघानं शानदार विजय मिळवलाय. डावखुरा गोलंदाज विजय गोहिल आणि अष्टपैलू अभिषेक नायर या विजयाचे शिल्पकार ठरले. विजयासाठी 232 धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादचा संघाचा दुसरा डाव 201 धावांत आटोपला आणि मुंबईनं 30 धावांनी विजय साजरा केला. गोहिल आणि नायर या दोघांनीही प्रत्येकी 5 बळी घेत मुंबईला विजय मिळवून दिला.
तब्बल 41वेळा रणजी विजेतेपद मिळवणारा मुंबईचा संघ अडचणीत आल्यावर नेहमीच उसळी घेतो, असा इतिहास आहे. या सामन्यातही त्यांनी अशीच उसळी घेत सामन्यावर पकड मिळवली. पहिल्या डावात 290 धावा करणाऱ्या मुंबईनं हैदराबादचा पहिला डाव 5 बाद 255 वरून 280 धावांत संपवला आणि सामन्यावर पकड घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या डावात 217 धावा करणाऱ्या मुंबईनं हैदराबादला 232 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हैदराबादनं चौथ्या दिवसअखेर 7 बाद 121 अशी मजल मारली, तेव्हाच मुंबईचा विजय निश्चित झाला होता. मुंबईचा नवोदित गोलंदाज विजय गोहिलने अचूक टप्प्यावर मारा केला आणि हैदराबादचे फलंदाज त्याला विकेट बहाल करत राहिले. तर मुंबईच्या पहिल्या डावात 59 धावा आणि सामन्यात 9 बळी घेणारा अभिषेक नायर सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू ठरला.