Advertisement

रणजी स्पर्धेत मुंबईवर पराभवाची टांगती तलवार


रणजी स्पर्धेत मुंबईवर पराभवाची टांगती तलवार
SHARES

४१ वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघावर या वर्षीच्या रणजी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळण्याची वेळ अाली अाहे. मुंबईला पहिल्या डावात १७३ धावांवर गुंडाळल्यानंतर अाता कर्नाटकने पहिल्या डावात ६ बाद ३९५ अशी दमदार मजल मारली अाहे. कर्नाटकने दुसऱ्या दिवशी २२२ धावांची अाघाडी घेत अापला उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला अाहे. मुंबईवर मात्र पराभवाची टांगती तलवार अाहे.


मुंबईच्या शिवम दुबेचे पाच बळी

कर्नाटकच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यात मुंबईच्या गोलंदाजांना अपयश अालं असलं तरी शिवम दुबे या नवोदित मध्यमगती गोलंदाजाने मात्र अापली छाप पाडली. कर्नाटकच्या फलंदाजांसमोर मुंबईचे अनुभवी गोलंदाज अपयशी ठरले तरी शिवम दुबेने पाच फलंदाजांना माघारी पाठवण्याची करामत केली.


कर्नाटकच्या चार फलंदाजांची अर्धशतकं

वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या नागपूरच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीवर कर्नाटकच्या फलंदाजांनी मुंबईच्या वेगवान माऱ्याला समर्थपणे तोंड दिले. कर्नाटकच्या चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी साकारत अापल्या संघाला मोठी अाघाडी मिळवून दिली. मयांक अगरवाल (७८), कौनेन अब्बास (५०), चिदंबरम गौतम (७८) अाणि श्रेयस गोपाळ (खेळत अाहे ८०) यांनी मुंबईच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा