मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईतल्या वानखेड स्टेडियमवर गुरुवारपासून चौथा कसोटी सामना सुरू झाला. पण मुंबईतल्या या कसोटीत भारतीय संघात एकही मुंबईकर खेळाडू नाहीये. तब्बल चार दशकांनंतर, मुंबईकर खेळाडूविना भारतीय संघ मुंबईत खेळतोय.
बोटांना झालेल्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेला या आणि पुढच्या चेन्नई कसोटीतही खेळता येणार नाहीये. त्याच्याऐवजी मनीष पांडेला संघात स्थान मिळालंय. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत शंका होती आणि तो अनफिट ठरला तर शार्दुल ठाकूरला राखीव ठेवण्यात आलं होतं. पण शमी फिट ठरल्यानं शार्दुलला अंतिम संघात स्थान मिळू शकलं नाही.
बुधवारी मुंबईत सराव करताना अजिंक्यच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याला लगेचच उपचारांसाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. अजिंक्यचं बोट फ्रॅक्चर झाल्याचं तपासणीतून स्पष्ट झालं.