हाँगकाँग येथे ४ आणि ५ ऑगस्ट रोजी एशिया रग्बी अंडर २० मेन्स/वुमन्स सेवेन्स चॅम्पियन्शीप स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत भारतीय महिला रग्बी संघाची धुरा मुंबईकर रुची शेट्टीच्या हाती सोपविण्यात आली असून रुचीसोबत भारतीय संघात गार्गी वालेकर या आणखी एका मुंबईकर खेळाडूचा समावेश आहे.
या दोघीही मुलुंडमध्ये राहणाऱ्या असून दोघींचे शालेय शिक्षण एकाच शाळेत झाले आहे. भारतीय महिला रग्बी संघातदेखील दोघीजणी मुंबईचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. याशिवाय संघात महाराष्ट्र, दिल्ली, ओडीशा आणि पश्चिम बंगाल मधील खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. तर संघाचे कर्णधारपद रुची शेट्टीच्या हाती सोपवण्यात आले आहे.
या स्पर्धेत एकूण ७ देश सहभागी होणार आहेत. त्यात हाँगकाँगसहित चीन, भारत, थायलंड, मलेशिया, उजबेकीस्तान आणि सिंगापूर यांचा समावेश असेल. नुकत्याच पार पडलेल्या 'पॅरिस वर्ल्ड गेम्स रग्बी सेवेन्स'मध्ये भारतीय महिला संघाने उत्तम कामगिरी केली होती. भारतीय महिला संघाने या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच आशियाबाहेरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतल्याची माहिती रग्बी इंडियाचे सचिव महेश मथाई यांनी दिली.
रुची शेट्टी (कर्णधार), गार्गी वालेकर, नीलम पाटील, रीया बिष्ट, रजनी साबर, बसंती पांगी, मंजुळता प्रधान, कबीता कस्तुरी, चंदा उरांव, स्वप्ना उरांव, सुमन उरांव आणि पूनम उरांव
कर्णधारपद भूषविण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. चांगला खेळ करण्यासाठी आम्ही पुरेपुर प्रयत्न करू. १४ वर्षांची असताना मी रग्बी खेळायला लागले. मी याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला असल्याने मला अशा स्पर्धांचा बराच अनुभव आहे. प्रशिक्षक नासीर हुसेन यांनी संघाकडून चांगला सराव करून घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चमकदार कामगिरी करू.
- रुची शेट्टी, कर्णधार, भारतीय महिला रग्बी संघ
महाराष्ट्राच्या तीन मुली भारतीय रग्बी संघात असल्याचे बघून खूप आनंद होत आहे. कर्णधार रुची आमच्यापैकी सर्वात अनुभवी आहे. पॅरीसमधील स्पर्धेचा तिला चांगला अनुभव आहे. त्यामुळे ती संघाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळू शकते. परदेशी खेळांडूची शरीरयष्टी भारतीय खेळाडूंच्या तुलनेत अधिक उजवी असली, तरी आम्ही आमच्या चपळ आणि कौशल्यपूर्ण खेळाने सर्वांनाच चकीत करू.
- गार्गी वालेकर, रग्बी खेळाडू
कोल्हापूरच्या बामणी गावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर रग्बी खेळणारी मी पहिली खेळाडू आहे. मी ११ वीत असताना रग्बी खेळायला सुरूवात केली होती. भारतीय संघात माझा समावेश झाल्याने माझे कुटुंबिय आनंदी झाले आहेत. मला लहानपणापासूनच कबड्डी आणि कुस्तीची आवड होती. त्यामुळे मी रग्बी खेळ निवडला. प्रशिक्षकांनी आमच्याकडून मजबूत सराव करवून घेतलेला आहे. त्याआधारे आम्ही अंतिम फेरीपर्यंत नक्कीच पाेहोचू शकतो.
- नीलम पाटील, रग्बी खेळाडू
हे देखील वाचा -
मुंबई मॅरेथॉनचे प्रायोजकत्व टाटा समुहाकडे
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)