Advertisement

अवघी मुंबई झाली मॅरेथॉनमय…


अवघी मुंबई झाली मॅरेथॉनमय…
SHARES

मुंबई कधीच झोपत नाही, असं म्हटलं जातं. पण एरवी सोमवार ते शनिवार आठवड्याचे ६ दिवस घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई रविवारी मात्र काही प्रमाणात शांत होती. हक्काच्या सुट्टीच्या दिवशी मस्त ताणून द्यावी आणि जानेवारी महिन्यातल्या गुलाबी थंडीत सूर्य उगवल्यानंतरही अंगावरची चादर न काढावी, हा जवळपास बहुसंख्य मुंबईकरांचा प्लान असतो. पण जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबईत पहाटेच्या गुलाबी थंडीतही ‘धावाधाव’ सुरू होते. निमित्त असतं मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या, सर्वांनाच फिटनेसचं वेड लावणाऱ्या आणि खेळांच्या बाबतीत मुंबईची किर्ती सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनचं.


धतिंगडान्स ते शर्यतीचं स्पिरिट

एरवी सकाळी मोजक्या प्रवाशांसह धावणाऱ्या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्या मॅरेथॉनच्या निमित्तानं मात्र दुथडी भरून वाहू लागतात. फक्त हौशे-नवखेच मुंबईच्या दिशेने कूच करत नाहीत. तर परदेशातून आलेल्या काळ्या-गोऱ्या अॅथलिट्सना चिअर-अप करण्यासाठी दूरवरून आलेल्या तमाम मुंबईकरांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. यंदाही हेच चित्र दिसून येत होतं. छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ते थेट वरळीपर्यंत धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईकरांनी रस्त्याच्या दुतर्फा तोबा गर्दी केली होती. बँडच्या तालावर, डिजेवर धतिंगडान्स करत अर्धमॅरेथॉन, पूर्णमॅरेथॉन आणि ड्रिम रनमध्ये सहभागी झालेल्यांच्या चेहऱ्यावर जणू आपण एका संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार आहोत, याचा आनंदच झळकत होता. हा आनंद मुंबईकरांचं खरं स्पिरिट दाखवून देत होता.


नौदलाच्या बँडने मनं जिंकली

डिजेचा तालावर थिरकत, लावणी नृत्यावर ठेका धरत प्रत्येकजण अॅथलिट्सचा उत्साह वाढवत होता. त्यातही अनेक वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनचं आकर्षण ठरत असलेल्या भारतीय नौदलाच्या बँडने उपस्थितांची मनं जिंकली. २०-२५ गायक-वादकांचा समावेश असलेल्या नौदलाच्या या बँडने अप्रतिम गाणी सादर करत आजची ही सकाळ अधिकच सुंदर बनवली. विशेष म्हणजे, पेडर रोडवर वास्तव्यास असलेले जपानी नागरिकही आपल्या देशाचे झेंडे घेऊन धावपटूंचा उत्साह वाढवित होते.


हौश्या-गवश्यांच्या आनंदाला धाण

मॅरेथॉन शर्यत म्हणजे हौश्या-गवश्यांची जत्राच. फिटनेसच्या बाबतीत जागरूक झालेले आणि नवीन वर्षात पोटाचा घेर कमी करण्याचा संकल्प करणारे अनेक हौशी अॅथलिट्सच्या आनंदाला जणू उधाणच आलं होतं.



हेही वाचा-

हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी झेंडा, महिलांमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधव, मोनिका आथरेची बाजी


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा