खोपोलीहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या मालडब्यात केरोसीनमुळे आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान लागलेली ही आग तातडीने विझविण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले होते. या आगीत कुणालाही दुखापत झाली नसल्याचा दावा यावेळी रेल्वे पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या आगीने लागलेल्या धुरात गुदमरून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
घाटकोपर ते विक्रोळी या दोन स्थानकांदरम्यान मंगळवारी रात्री खोपोली-सीएसटी जलद लोकलच्या मालडब्याला आग लागली होती. प्रवाशांची आरडाओरड आणि दरवाजा वाजविण्याचा आवाज ऐकूण मोटरमनने तात्काळ गाडी थांबविली. मोटरमन आणि गार्डच्या प्रसंगावधानामुळे वेळेत आग आटोक्यात आणणे शक्य झाले. यामुळे मोठा अपघात टळला असला तरी या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला होता.
प्रत्यक्षात मात्र या आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्य झाल्याचे पुढे आले आहे. अाग लागल्यावर जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या लक्ष्मी स्वामी (60) यांना वयस्कर असल्यामुळे लांब धाव घेता आली नाही आणि धुरात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. लोकलच्या मालडब्याला रात्री 8 च्या सुमारास आग लागली होती, तर लक्ष्मी यांचा मृतदेह पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर-विक्रोळी स्थानकादरम्यान आढळून आला.
पोलिसांनी या महिलेला त्वरीत राजावाडी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना बुधवारी सायंकाळच्या वेळेस उघडकीस आली. या घटनेवरून रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांचा गलथान कारभारही चव्हाट्यावर आला आहे.