गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. विविध कारणांमुळे गेल्या वर्षांत बेस्टला तब्बल १८०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने सोमवारी दिली. ७ ऑगस्ट रोजी बेस्टचा ७१ वा महापालिकाकरण दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त कुलाबा येथील बेस्ट भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
सध्या बेस्टकडे ३३३७ बस गाड्यांचा ताफा आहे. यामध्ये एकमजली, दुमजली (डबलडेकर), मिडी, इलेक्ट्रिक मिडी, वातानुकूलित अशा बसगाड्यांचा समावेश आहे. यापैकी ९० टक्के बस दररोज रस्त्यावर धावत असल्या, तरी त्यांना रोड अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यातील पहिला अडथळा आहे, मुंबईतील वाहतूककोंडीचा. रस्त्यावर वाढलेल्या इतर वाहनांमुळे बेस्टच्या वेगावर मर्यादा येऊन इंधन नाहक वाया जातं. परिणामी इंधनावर अतिरिक्त खर्च होतो.
दुसरा अडथळा म्हणजे वाढत्या स्पर्धेचा. रिक्षा-टॅक्सीसोबतच प्रवाशांना रस्ते प्रवासासाठी आता ओला, उबर यांचा पर्याय मिळाला आहे. यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत चांगलीच घट झाली आहे. इतर प्रवाशांसाठी कमी प्रवासी संख्या असलेल्या भागातही बेस्ट चालवली जाते. मात्र त्यातून पाहिजे तेवढा महसूल बेस्टला मिळत नाही.
बेस्टच्या सर्व बसगाड्या मिळून दररोज ५ लाख किमीचा प्रवास पूर्ण करण्याच उद्दिष्ट्य ठेवण्यात आलं आहे. मात्र वरील कारणांमुळे यापैकी १५ हजार किमीचा प्रवास बेस्ट पूर्ण करू शकत नाही. बेस्टच्या १० पैकी ३ फेऱ्या दररोज रद्द केल्या जातात. त्यामुळे बेस्टचा दरदिवशी ५५ लाख रुपयांचा महसूल बुडतो. जो बेस्टचा अतिरीक्त तोटा मानला जातो.
मुंबईकरांसाठी बेस्ट ही दुसरी लाईफ लाइन मानली जाते. सध्या दररोज २५ ते ३० लाख प्रवासी बेस्टमधून प्रवास करतात. महिला आणि विद्यार्थी प्रामुख्याने बेस्ट बसचा जास्तीत जास्त वापर करतात.
हेही वाचा-
महापौरांच्या बिघडलेल्या वाहनावर पावणेचार लाखांचा खर्च
मानखुर्दमध्ये बेस्ट बस पेटवणाऱ्या तिघांना अटक
बेस्टचा ट्रायमॅक्स कंपनीला रामराम