दरवर्षी रेल्वे आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस देण्यात येतो. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस रखडण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, आता बेस्ट उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. औद्योगिक न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार बेस्ट उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनानं जाहीर केलेला ९ हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे.
बेस्ट कामगारांना यंदा प्रत्येकी ९ हजार १०० रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची घोषणा बेस्ट प्रशासनानं केली होती. बेस्ट समितीच्या बैठकीत प्रशासनानं ही घोषणा केली. त्यासह अन्य वाटाघाटीसंदर्भातील मुद्द्यांवरून बेस्ट कामगार संयुक्त कृती कामगार समितीनं औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयानं समितीनं शुक्रवारी पुकारलेल्या संपासही तात्पुरती मनाई केली आहे.
काही महिन्यांपासून वेतन करारावरून बेस्ट उपक्रमातील वेगवेगळ्या कामगार संघटनांमध्ये मतभिन्नता आहे. बेस्टमधील शिवसेना, भाजप प्रणित कामगार संघटनांनी वेतन करारास मान्यता दिली आहे. तर, कृती समितीच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामगार संघटनांनी त्यास विरोध दर्शवला आहे.
या पार्श्वभूमीवर, कृती समितीनं औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असून, न्यायालयानं कामगारांना बोनस देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये, असं स्पष्ट केलं. तसेच प्रशासनानं कामगार संघटनांशी वाटाघाटी करण्याचंही नमूद केलं आहे.
हेही वाचा -
नरेंद्र मोदी- उद्धव ठाकरे यांची मुंबईत संयुक्त प्रचारसभा
मुंबई मेट्रोच कराणार मराठी माणसाचा घात- राज ठाकरे