गेल्या कित्येक दिवसांपासून पर्यावरण प्रेमी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आणि मुंबईकरांचे लक्ष ज्या मेट्रो-3 मधील झाडांच्या कत्तलीविरोधातील याचिकेकडे लागलं होतं, त्या याचिकेवरील निकाल अखेर शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला. मेट्रो-3 प्रकल्प मुंबईकरांसाठी गरजेचा असून, झाडांच्या पुनर्रोपणाची हमी एमएमआरसी आणि महानगरपालिकेकडून देण्यात आली असल्याचे म्हणत न्यायालयाने झाडांच्या कत्तलीवरील बंदी उठवली आहे. मात्र त्याचवेळी याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस मात्र झाडांच्या कत्तलीवरील बंदी कायम असणार आहे.मेट्रो 3 प्रकल्पात सुमारे 5 हजार झाडे कापली जाणार आहेत. या झाडांच्या कत्तलीला विरोध करत फेब्रुवारी 2017 मध्ये सेव्ह ट्रीच्या सदस्या निना वर्मा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्वरीत फेब्रुवारीमध्ये झाडांच्या कत्तलीला स्थगिती देत संपूर्ण मेट्रो 3 मार्गावरील एकाही झाडाची कत्तल अंतिम सुनावणी होईपर्यंत न करण्याचे आदेश एमएमआरसीला दिले होते. मात्र त्याचवेळी एमएमआरसीने मेट्रोच्या कामाला वेग दिला, पण झाडेच कापता येत नसल्याने अनेक ठिकाणांच्या कामावर त्याचा परिणाम होऊ लागला होता. त्यामुळे सातत्याने प्रत्येक सुनावणीत एमएमआरसीकडून स्थगिती उठवण्याची मागणी होत होती.
मात्र न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली आणि बुधवारी दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकत निकाल राखीव ठेवला. त्यानुसार शुक्रवारी न्यायालयाने अंतिम निकाल देत मेट्रो-3 ला हिरवा कंदील दिला तर झाडांच्या कत्तलीवरील बंदीही उठवली. मात्र याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितल्याने दहा दिवसांची वेळ याचिकाकर्त्यांना अपीलासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो-3 चा मार्ग मोकळा झाला असला तरी, एमएमआरसीला पुढच्या दहा दिवसात झाडांना हात लावता येणार नाही.
दहा दिवसांत काही तरी चांगलं होईल. निकालामुळे आम्ही निराश झालोय, पण हार मानलेली नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत. आम्हाला आशा आहे की, या दहा दिवसांत काही तरी चांगलं होईल.
झोरू बाथेना, याचिकाकर्ते
चर्चगेट येथे निदर्शने
या निकालानंतर सेव्ह ट्रीच्या सदस्यांनी चर्चगेट परिसरात जोरदार निदर्शने केली. सेव्ह ट्री म्हणत झाडे वाचवण्यासाठी यापुढेही रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरूच राहील असा निर्धार सेव्ह ट्रीच्या सदस्यांनी केला आहे .