एल्फिन्स्टन-परळला जोडणाऱ्या फूटओव्हर ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेनंतर आता या ब्रिजचा विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या पुलाचं बांधकाम भारतीय लष्कर करणार आहे. पण पुलाच्या बांधकामासाठी लागणारं साहित्य ठेवायला जागेची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे, पुलाच्या बांधकामासाठी लागणारं साहित्य नेमकं कुठे ठेवायचं आणि बांधकाम कसं करायचं? हा प्रश्न सध्या लष्कर आणि रेल्वे प्रशासनाला सतावत आहे. या वृत्ताला मध्य रेल्वे प्रशासनानंही दुजोरा दिला आहे.
एल्फिन्स्टन-परळला जोडणाऱ्या फूटओव्हर ब्रिजचं काम लष्कराच्या ‘बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप’ तर्फे केलं जाणार आहे. या ग्रुपने तयार केलेल्या आराखड्याला पश्चिम रेल्वेने अंतिम मंजुरीही दिली आहे.
या पुलाच्या बांधकामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर पुलाचं बांधकाम सुरू होणार आहे. पुलाचा विस्तार करण्यासाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुलासाठी आवश्यक असलेलं बांधकाम, पुलाचा पाया खणण्यासाठी नियोजित जागेचं नियोजन जरी लष्करानं केलं असलं तरी पादचारी पुलावर निमुळती जागा आहे. तसंच दादरकडून फुलबाजाराच्या दिशेकडील जागाही निमुळती असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे लष्कराला या ठिकाणी बांधकाम करताना लागणारं साहित्य कुठे ठेवायचं? असा प्रश्न पडला आहे.
हेही वाचा -
एल्फिन्स्टन दुर्घटनेला रेल्वे सुरक्षा आयुक्तही जबाबदार!, आरटीआय कार्यकर्ते गलगली यांचा आरोप