Advertisement

जीएसटीमुळे 'शिवशाही' झाली लेट!


जीएसटीमुळे 'शिवशाही' झाली लेट!
SHARES

राज्यातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवास देण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही या अद्ययावत बसेस आपल्या ताफ्यात आणल्या आहेत. एसटीच्या सेवेत दाखल झालेल्या वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बसची शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पाहणी केली.


2 हजार शिवशाही बसेस दाखल होणार

देशभरात लागू करण्यात आलेल्या जीएसटी या कर प्रणालीमुळे पुरवठादार कंपन्यांना अडचणी निर्माण झाल्याने शिवशाही बस एसटीच्या ताफ्यात दाखल होण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.

एसटी महामंडळाकडून 2 हजार शिवशाही बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यापैकी भाडेतत्वावर असलेल्या 1500 बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होण्यास सुरुवात देखील झाली आहे. यामधील काही बस जून महिन्यात दाखल झाल्या. त्यानंतर एसटीच्या ताफ्यात आणखी काही बसेस दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, जीएसटीमुळे अडथळा येत आहे.


जीएसटी लागू झाल्यानंतर 18 टक्के कर

जीएसटी लागू झाल्यानंतर 18 टक्के कर भरावा लागत असल्याने पुरवठादारांसमोर अडचण निर्माण झाली. मात्र यावर तोडगा निघाल्यानंतर आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही बस दाखल होणार आहेत. डिसेंबरच्या अखेरपर्यंत भाडेतत्वावरील एकूण 1500 बसेस दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

खासगी बसबांधणीत अग्रेसर असलेल्या एमजी समुहाला 250 शिवशाही बस तयार करण्याची ऑर्डर नुकतीच महामंडळाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार एमजी समुहाकडून आरामदायी वातानुकूलित शिवशाही बसचा पुरवठा करण्यात येणार आहे.


प्रवाशांना एसटीकडे वळवण्याचा प्रयत्न

किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी तसेच खाजगी वाहतुकीकडे गलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळवण्यासाठी एसटी महामंडळ विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व सुविधांनी युक्त, वातानुकूलित आणि आरामदायी अशा 2 हजार शिवशाही बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. या बसेस मुख्यत्वेकरून लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला आणि आंतरराज्य मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे.

सध्या मुंबई-रत्नागिरी आणि पुणे-लातूर या मार्गावर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. इतर भागात टप्प्याटप्प्याने या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती रावते यांनी दिली. या बससाठी प्रतिप्रवासी प्रती किमी साधारण दीड रुपयांइतका किफायतशीर दर आहे. बसमध्ये प्रत्येक प्रवाशाला स्वतंत्र मोबाईल चार्जर, सीट बेल्ट, पुशबॅक पद्धतीच्या सीटस्, दोन एलसीडी टीव्ही अशा सुविधा आहेत. पूर्ण वातानुकूलित आणि आरामदायी असलेली शिवशाही बस प्रवाशांच्या निश्चितच पसंतीस उतरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.



हेही वाचा - 

पहिल्याच दिवशी शिवशाही बस हाऊसफुल्ल

लाल डबा बदलतोय...प्रवाशांना वायफाय देतोय!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा