विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीची डागडुजी व दुरुस्ती करण्यात येणार आहे. डागडुजी व दुरुस्तीचं कामामुळं तब्बल १०२ दिवस मुख्य धावपट्टी बंद असणार आहे. त्याशिवाय, यावेळी विमान उड्डाणं आकारानं लहान व जोखमीच्या पर्यायी धावपट्टीवरून होणार आहेत.
देशात सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास २२ हजार ६०० उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील ३ महिने विमानानं प्रवास करणार असाल तर प्रवाशांनी विमानाच्या वेळा तपासून घेणं गरजेचं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सरासरी ९०० तर तासाला ४५ ते ४८ विमानांची ये-जा असते. यापैकी २० ते २३ विमानं उडणारी असतात. विमानतळाला २ धावपट्ट्या असून त्या एकमेकांना छेदतात. यापैकी घाटकोपर ते विलेपार्ले या मुख्य धावपट्टीचाच सर्वाधिक वापर होतो. याच धावपट्टीची सोमवार ४ नोव्हेंबरपासून डागडुजी करण्यात येणार आहे.
डागडुजीचं काम हे २८ मार्चपर्यंत दररोज सकाळी ९.३० ते ५.३० दरम्यान रविवार वगळता आठवड्यातून ६ दिवस करण्यात येणार आहे. याखेरीज २५ डिसेंबर, १ जानेवारी, १५ जानेवारी, १९ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी, १० मार्च व २५ मार्च या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी हे काम केलं जाणार नाही. त्यादिवशी व प्रत्येक रविवारी धावपट्टी पूर्णवेळ वापरात असणार आहे.
या डागडुजीच्या वेळेत मुंबईहून साधारण २२४ विमानं आकाशात झेपावतात. तर तेवढीच उतरतात. या सर्व विमानांची ये-जा कुर्ला ते अंधेरी दरम्यान असलेल्या धावपट्टीवरून होणार आहे. ही धावपट्टी तुलनेने आकाराने लहान असून कुर्ला बाजूनं अणुशक्तीनगरच्या टेकडीचा अडथळा आहे. केवळ कुशल वैमानिकांनाच या धावपट्टीचा वापर करता येतो. त्यामुळं दुरुस्तीच्या संपूर्ण कालावधीत सुमारे २२ हजारहून अधिक जाणाऱ्या व तितक्याच येणाऱ्या विमानांना विलंब होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
भेंडी बाजार परिसरातील इमारतीला आग
व्हॉट्सअप हेरगिरी थांबवा, धनंजय मुंडे यांचं राज्यपालांना पत्र