गेल्या ५ दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक सतत विस्कळीत होतं आहे. रुळांना तडे गेले, ओव्हरहेट वायर तुटली, सिग्नल यंत्रणेत बिघाड अशा विविध कारणांमुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होतं आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत होत असल्यानं प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे. लोकल २५ ते ३० किंवा ४० ते ४५ मिनिटं उशीरानं धावत असल्यामुळं प्रवाशांना निश्चित वेळेत कामावर अथवा महत्वाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. त्यामुळं प्रवाशांकडून वारंवार मध्य रेल्वे टीका होत आहे. या त्रासाला कंटाळून प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहत आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीची रेल्वे प्रशासन दखल घेणार का? असा प्रश्न संघटनांसह प्रवाशांना पडला आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक १० जूनपासून सलग ५ दिवस विस्कळीत होत आहे. सोमवार १० जून दिवस पहिला. या दिवशी कोपर स्थानकात पेंटाग्राफमध्ये ठिणग्या पडल्यामुळं मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यावेळी मुंबईसह उपनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली असल्यानं हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत होते. त्यामुळं सगळ्या लोकल स्टेशनवर पोहचण्यासाठी सुमारे ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागत होता.
मंगळवार ११ जून दिवस दुसरा. या दिवशी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं मध्य रेल्वेच्या कल्याण स्थाकातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या तब्बल २५ ते ३० मिनिटं उशीरानं सुरू होत्या. कल्याणहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाल्यानं कल्याण, डोंबिवली स्थानकांसह इतर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. सकाळच्या सुमारास लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यानं रेल्वे प्रशासनाने तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेतलं.
बुधवार १२ आणि गुरुवार १३ जून रोजी देखील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्ही दिवशी सकाळच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक उशीरानं सुरू होती. कल्याणहून मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक सलग २ दिवस २० ते २५ मिनिटं उशीरानं सुरू होती. कल्याणहून अनेकजण कामासाठी मुंबईत येत असतात. मात्र, कामाला जाणाच्या वेळेतचं वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना सातत्यानं लेट मार्कला समाेरं जाव लागत आहे. त्याशिवाय अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत मध्य रेल्वेच्या व्यवस्थापनावर टीका केली होती. गुरूवारी संध्याकाळी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आली होती.
शुक्रवार १४ जून दिवस पाचवा. शुक्रवारी दुपारी सलग पाचव्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मुलुंड स्थानकात शॉर्ट सर्किट झाल्यानं रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेनं जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला. सलग पाचव्या दिवशी त्रासाला सामोरं जावं लागलं. यामुळे प्रवाशांच्या संतापात भर पडली.
मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असल्यानं नोकरदार तसंच, चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं ८० लाख प्रवाशांना वेठीस धरू नये. यासोबतच लवकरात लवकर हा वाहतुकीचा त्रास दूर करण्याचं आवाहन प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनास केलं. त्याशिवाय पावसाआगोदर मध्य रेल्वेची ही स्थिती आहे, तर पावसाळ्यात काय हाल होईल? या कल्पनेनं प्रवासी धास्तावले आहेत.
मुंबईत पावसाळ्यात दरवर्षी इंचभर पाऊस पडला की, रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. यंदा पावसामुळं वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं मान्सून आधीच तयारी सुरू केली होती. पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकांत एकूण ७९ पंप मशीन बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनानं घेतला. मध्य रेल्वेच्या ६ ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तुंबतं. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप मशीनच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास रेल्वेचा वेग मंदावतो. त्यामुळं रेल्वेचं वेळापत्रक पूर्णत: कोलमडून जातं. परिणामी, प्रवाशांना पायपीट करत इच्छितस्थळी पोहोचावं लागतंं. वादळवारा आणि पाऊस पडल्यामुळं झाडं पडण्याच्या घटना, सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणं अशा घटना घडतात. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं, नालेसफाई, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणं, रेल्वे रुळांची स्वच्छता करणं, रेल्वे मार्गात येणाऱ्या लोखंडी वस्तूंना गंजरोधक रंग लावणं ही कामं सध्या सुरू आहेत.
छत्रपती शिवजी महाराज टर्मिनस (सीएमएमटी) येथील हिमालय पूलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं ११९ पादचारी पूल आणि वाहतूकीच्या पूलांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. त्याशिवाय रेल्वे स्थानकांवरील छतांच्या दुरुस्तीचं काम देखील सुरू आहेत. त्यामुळं पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गैर सोय होण्याची शक्यात आहे. दरम्यान, रेल्वेनं पूलांसह छत आणि इतर डागडुजींची कामांना एकाच वेळी सुरुवात केल्यानं प्रवाशांना रेल्वे स्थानकात धक्काबुक्कीला समोर जावं लागतं आहे. मध्य रेल्वेच्या अनेक महत्वांच्या स्थानकातील पादचारी पूल वापरासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मध्य रेल्वेनं सर्व स्थानकात आरपीएपच्या जवानांनी तैनात केलं आहे.
मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. तरीही रेल्वे स्थानकांवर दुरुस्तीची काम अद्यापही सुरूच आहे. या कामांदरम्यान कंत्राटदारांनी सुरक्षिततेची सर्व परिमाणे, नियमावली धाब्यावर बसवून कंत्राटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचा देखील जीव धोक्यात आणला आहे. कंत्राटदारांच्या बेपर्वाईमुळं मुंबई सेंट्रल स्थानकात छत दुरुस्तीचं काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा छतावरून पडून मृत्यू झाला. हरीराम वर्मा असं त्याचं नाव असून, सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत पडल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. तसंच, पावसाळा सुरू झाल्यानं या त्रासात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रवाशांची दिवसेंदिवस होणारी गैर सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या या समस्यांवर तोडगा काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाला डच्चू, कुणाला मिळणार संधी?
उदयनराजे भडकले, म्हणाले मी चक्रम आहे, पण जनतेसाठी...