मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा अखेर सोमवारपासून (१ फेब्रुवारी) सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी चाकरमान्यांच्या वेळेत ही लोकल धावणार नसल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आता, लोकल सुरू झाल्यानं लॉकडाऊनमुळं ज्या प्रवाशांच्या पासची मुदत संपली, त्यांना येत्या सोमवारपासून शिल्लक राहिलेल्या दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
२४ मार्च २०२० पासून उपनगरीय रेल्वे सेवा बंद झाली. त्याआधी ज्या प्रवाशांना लोकलचे १ महिना, ३ महिने, ६ महिने व वर्षभराचे पास काढले होते अशा प्रवाशांच्या पासची मुदत लॉकडाऊनमध्ये संपली. यात अनेकांनी द्वितीय श्रेणीबरोबरच प्रथम श्रेणीचेही, तर काहींनी एसी लोकलचे पास काढले होते.
सेवा बंद असल्याने सामान्य प्रवाशांनी काढलेल्या पासना मुदतवाढ मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू होताच प्रथम त्या प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली.
ज्या प्रवाशांच्या पासची मुदत कोरोनाच्या कालावधीत संपली व लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांना मुदतवाढ मिळू शकली नाही, अशा प्रवाशांच्या पासला येत्या सोमवारपासून मुदतवाढ मिळणार आहे. लॉकडाऊनमुळं पासचे जेवढे दिवस शिल्लक राहिले, तेवढी मुदतवाढ प्रवाशांना देण्यात येणार आहे.