इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोलवसुली वाढावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं २९ फेब्रुवारीपर्यंत फास्टॅग (FASTag) शुल्क न आकारण्याचे ठरवले आहे. यामुळे निःशुल्क फास्टॅग आणखी १५ दिवस वापरता येणार आहे.
इलेक्ट्रॉनिक टोल संकलनास आणखी प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल हायवे अॅथॉरटी ऑफ इंडियानं (NHAI) २९ फेब्रुवारीपर्यंत फास्टटॅग मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं देशातील ५२७ हून अधिक राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅगवर आधारित टोल वसुली सुरू केली आहे. यापूर्वी एनएचएआयनं २२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१९ पर्यंत फास्टॅग विनामूल्य दिले होते.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, फास्टॅगच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग टोलवर डिजिटल टोल संकलनाला वाव देण्यासाठी एनएचएआयनं १५ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान १०० रुपये फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फास्टॅग घेण्यास उत्सुक वाहनधारक वाहननोंदणी प्रमाणपत्रासह (आरसी) कोणत्याही अधिकृत पॉइंट ऑफ सेलवर जाऊन फास्टॅगसाठी नोंदणी करता येणार आहे. याशिवाय फास्टॅग सर्व राष्ट्रीय महामार्ग शुल्क प्लाझा, प्रादेशिक परिवहन कार्यालये, कॉमन सर्व्हिस सेंटर, वाहतूक तळ आणि पेट्रोल पंप येथेही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
निवेदनात असंही म्हटलं आहे की, कार मालक त्यांच्या जवळच्या एनएचएआय पॉईंट ऑफ सेल ठिकाण शोधण्यासाठी मायएफएस्टाग अॅप डाउनलोड करू शकतात किंवा www.ihmcl.com वर भेट देऊ शकतात किंवा १०३३ एनएच हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकतात.
केंद्र सरकारनं (Central Government) फास्टॅग योजना बंधनकारक केल्यानंतर ही योजना केवळ राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) पथकर नाक्यांपुरतीच असल्याचं भूमिका मुंबईतील पथकर नाक्यांच्या व्यवस्थापनानं घेतली होती.
गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या सर्व ५ पथकर नाक्यांवर फास्टॅगच्या चाचण्या (Fastag Test) महामंडळातर्फे घेण्यात येत आहेत. कोणत्या मार्गिका फास्टॅगसाठी राखीव करता येतील, त्यामुळं वाहतूक कोंडी होणार नाही याच्या चाचण्या सुरू असून, महिनाअखेपर्यंत सर्व पथकर नाक्यांवर फास्टॅग सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती मिळते.
मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर (पश्चिम द्रुतगती मार्ग), मुलुंड, ऐरोली (मुलुंड-ऐरोली मार्ग) आणि वाशी (शीव-पनवेल मार्ग) या ५ ठिकाणी पथकर नाके आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात नाक्यांवरील काही मार्गिकाच फास्टॅगसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत.
हेही वाचा