कर्जात बुडालेल्या विमान कंपनी जेट एअरवेजला अखेर टाळं लागलं आहे. बुधवारी रात्रीपासून जेटची सेवा बंद होणार आहे. कर्जबाजारी जेटला ४०० कोटी रुपयांचं कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला आहे. त्यामुळे सर्व पर्याय संपल्याने कंपनीची सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जेट एअरवेजची सध्या पाच विमाने आहेत. या पाच विमानांची सेवा मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. रात्री १०.३० वाजता जेटचं विमान शेवटचं उड्डाण घेणार आहे. जेट एअरवेजच्या बोर्डाच्या बैठकीनंतर विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनी बंद झाल्यामुळे २० हजार लोक बेरोजगार होणार आहेत.
मागील आर्थिक वर्षात जेटला ४२४४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. जानेवारीपासून पायलट, अभियंते आणि व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेतन मिळालेलं नाही. अन्य कर्मचाऱ्यांना आंशिक वेतन दिलं जात होतं. जेटची ९० टक्क्यांहून अधिक विमाने सध्या जमिनीवर आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारासह दैनंदिन खर्चासाठी कंपनीला किमान १५०० कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची गरज आहे. कर्जपुरवठा करणाऱ्या स्टेट बँकेने हा निधी देण्यास नकार दिला होता.