कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन (lockdown) करण्यात आला होता. मात्र, 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत राज्य सरकारनं मुंबईतील सर्व सुविधा हळुहळू सुरू केल्या आहेत. विशेषतः मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) सुरू केली असून आता मुंबई मेट्रो सेवा (mumbai metro) सुरू करण्यासही हिरवा कंदील दाखवला. अशातच आता मेट्रोसोबत मोनोरेल ही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
राज्य सरकारनं बुधवारी मेट्रो सेवेला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार १९ ऑक्टोबरपासून मेट्रो धावणार आहे. परंतू, राज्य सरकारच्या आदेशात मोनो रेल्वेबाबत उल्लेख नसला तरी मेट्रोच्या धर्तीवर नियमांचे पालन करून मोनोही सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. 'मुंबई मोनो रेल'नं (mumbai monorail) ट्वीटरच्या माध्यमातून आपली सेवा पूर्ववत करण्यात येत असल्याबाबत घोषणा केली आहे.
Monorail services will be resumed from Sunday, 18th October, 2020 in a graded manner.#MumbaiMonorail
— Mumbai Monorail (@monorail_mumbai) October 14, 2020
रविवार दि. १८ ऑक्टोबरपासून मोनो रेल सेवा सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासोबतच प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. तसंच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'मास्क नाही तर प्रवास नाही' असे स्पष्ट करण्यात आले असून जे प्रवासी मास्क घालतील त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबत अन्य आवश्यक सूचना व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मोनोरेलने केले आहे.