Advertisement

मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ खुले करण्यास मान्यता

मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ वाहतुकीस खुले करण्यास अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळं २० ऑक्टोबरपासून येथून नियमित विमान प्रचलन सुरू केले जाईल

मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ खुले करण्यास मान्यता
SHARES

मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ वाहतुकीस खुले करण्यास अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळं २० ऑक्टोबरपासून येथून नियमित विमान प्रचलन सुरू केले जाईल. नव्या वेळापत्रकानुसार, टर्मिनल १ वरून १५६, तर टर्मिनल २ वरून दररोज ३९६ विमाने ये-जा करतील. पहिल्या टप्प्यात गो फर्स्ट, स्टार एअर, एअर एशिया आणि ट्रू जेटची उड्डाणे नियोजित करण्यात आली आहेत. 

३१ ऑक्टोबरपासून इंडिगोची निवडक विमाने टर्मिनल १ वरून उड्डाण घेतील. मात्र, त्यांची बहुतांश सेवा टी२ वरून सुरू राहील. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनातर्फे करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून वाढत असलेली प्रवासी संख्या हाताळण्यासाठी टर्मिनल १ खुले करण्याची मागणी पुढे आली होती. मुंबई विमानतळ प्रशासनाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि संबंधित यंत्रणांना त्याबाबत पत्र लिहिले होते. या यंत्रणांची मान्यता मिळाल्यामुळे २० ऑक्टोबरपासून टर्मिनल १ खुले करण्याचा मार्ग मोकळा झाला.

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल- १ वरून देशांतर्गत, तर टर्मिनल- २ वरून आंतराष्ट्रीय आणि काही देशांतर्गत विमानांचे उड्डाण होते. मे २०२० मध्ये हवाई प्रवासावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर केवळ टर्मिनल- २ वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मर्यादित फेऱ्या सुरू असल्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण येथूनच होत होते.

फेब्रुवारी महिन्यापासून प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येऊ लागल्याने तब्बल वर्षभरानंतर १० मार्च २०२१ रोजी टर्मिनल- १ खुले करण्यात आले. परंतु, दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्याने अवघ्या काही दिवसांत २१ एप्रिलपासून पुन्हा डोमॅस्टिक टर्मिनल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा