प्रवाशांची वाढती गर्दी, रेल्वे स्थानकावरील पुलावर होणारी चेंगराचेंगरी लक्षात घेता फक्त दृष्य टिपणारे नव्हे, तर त्याबाबत यंत्रणेला सतर्क करणारे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमरे पश्चिम रेल्वेवर बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
व्हिडिओ अॅनेलिटिकल कॅमेऱ्यांमुळे रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला गर्दीची त्वरीत माहिती मिळू शकेल आणि त्यानुसार उपाययोजना करणे सोपे जाईल या दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्यावतीने हा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेकडून स्थानकांची तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीकडूनही काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातील एक सूचना म्हणजे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा. या प्रकरणी अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. या समितीने केलेल्या शिफारशीवरून ‘व्हिडिओ अॅनॅलिटिकल यंत्रणा’ असलेले कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अत्याधुनिक सीसीटीव्हीमध्ये संशयित वस्तू, व्यक्तींकडे लक्ष वेधले जाते. त्यातील सॉफ्टवेअरच्या आधारे ही माहिती नियंत्रण कक्षाला दिली जाते. त्यानंतर कक्षाकडून तिथल्या अधिकाऱ्यांना त्याची संपूर्ण माहिती पुरवली जाण्याची पद्धत अवलंबली जाते. स्थानकावरील उपलब्ध मनुष्यबळास तातडीने अतिरिक्त मदत मिळण्याच्या अनुषंगाने ही यंत्रणा प्रभावी ठरेल, असा दावा होत आहे.
रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) चौकीत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असते. अशावेळी आपत्कालीन स्थितीविषयी माहिती मिळाल्यास जादा कर्मचारी-अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पाठवणे शक्य होण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
पादचारी पूल किंवा फलाटावर प्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाल्यास तातडीने या यंत्रणेमार्फत त्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यानंतर ज्या स्थानकात गर्दी झाली आहे, त्या स्थानकात नियंत्रण करण्यासाठी स्टेशन मास्तर आणि संबधित रेल्वे सुरक्षादलाशीही संपर्क साधून अतिरिक्त मनुष्यबळ पाठवण्यात येईल. या यंत्रणेकडून प्रवाशांचा चेहराही सहजरीत्या टिपता येऊ शकेल.
हेही वाचा -
एल्फिन्स्टन पूल दुर्घटना: 'ते' गहिरे घाव भरून निघण्यास थोडा वेळ लागेल...
एल्फिन्स्टन पूल दुर्घटना: मरेच्या ६ तर, परेच्या ४ पुलांचं ऑडिट