संपावर गेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. सोमवारीही १ हजार ८८ कर्मचाऱ्यांचं निलंबन तर २५४ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. पण कितीही कारवाई केली तरी विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन कायम राहणार, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात एसटीचे २०० कर्मचारी अद्यापही आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत.
''आम्हाला राज्य सरकारकडून कारवाईची भीती दाखवली जात आहे. पण कारवाई आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही आतापर्यंत कारवाईतच जगत आलो आहोत. त्यामुळं कितीही कारवाई झाली तरी आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही'', असं एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे.
राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्याचे आवाहन केलं आहे. खाण्यापिण्याचा खर्च परवडत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी परतीची वाट धरली आहे. पण ते घरी परत गेले तरी काम बंदच ठेवणार आहेत. त्यामुळं आझाद मैदानातील गर्दी कमी झाली तरी आंदोलन सुरूच असणार आहे.
एसटी महामंडळाचा संपातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. सोमवारी २५४ जणांची सेवा समाप्ती केली असून, आतापर्यंत सेवासमाप्ती केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या १७७९ झाली आहे, तर १०८८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई असून एकूण ७५८५ जणांना निलंबित केले आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून सकारात्मक मार्ग काढावा यासाठी संघर्ष एसटी कामगार युनियननं सोमवारपासून बेमुदत लक्षवेधी उपोषणाला सुरुवात केली आहे. तसे पत्रदेखील मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
सोमवारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी एसटीच्या परळ आगारात उपोषण सुरू केले. परंतु दादर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ७ तासानंतर मुंबईत उपोषण न करण्याबाबतची समज देत त्यांची पोलिसांनी सुटका केली. यामुळे आता पुण्यात उपोषण करण्याचा निर्णय राव यांनी घेतला आहे.