मुंबईशी संलग्न असणाऱ्या विरार ते मिरा रोड या क्षेत्रात लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथील प्रवाशांना सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी याकरिता विरार ते मिरा रोड मार्गावर मेट्रोची मागणी लोकसभेत खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नागरिकांना पर्यायी मार्गाची व्यवस्था होणार आहे.
लोकसभेत पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. प्रस्तावाला मंजुरी देऊन मार्गाची पाहणी करून कार्यवाही करावी, अशी मागणीदेखील केली आहे.
वसई-विरार महापालिका व मिरा-भाईंदर महापालिका मेट्रो मार्ग क्रमांक एम-१३ ने जोडले गेल्यास प्रवास करणे सुलभ होणार आहे. वसई-विरारची लोकसंख्या अधिक आहे, त्यामुळे मेट्रोचा फायदा होईल. याकरिता केंद्र सरकारकडे मागणी केली आहे, अशी माहिती पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी दिली.
वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाख आहे; तर मिरा-भाईंदर शहराचेदेखील नागरिकीकरण झपाट्याने होत आहे; मात्र नागरिकांसाठी लोकल प्रवास नेहमीच धोकादायक व दमछाक आणणारा ठरत आहे. सोईंचा अभाव असतानादेखील येथील चाकरमानी हे मुंबई, ठाणे परिसरात ये-जा करण्यासाठी लोकल रेल्वेचा वापर करतात. लोकलमधील प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना रोजच करावा लागतो.
पर्यायाने प्रवाशांना रेल्वे सेवा तोकडी पडत असल्याने या ठिकाणी मेट्रो कॉरिडॉरची सुविधा मिळाल्यास प्रवास करणे सोईचे होणार आहे. त्यातच नवे मार्ग विकसित करण्याची गरज ओळखून आता केंद्र सरकारकडे मागणी केली जात आहे. जेणेकरून येथील दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना नवा मार्ग मिळू शकणार आहे.
भारतीय रेल्वे, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, मुंबई रेल्वे विकास महामंडळ व जागतिक बँक मुंबई वाहतूक नेटवर्कच्या सुधारणा आणि विस्तारासाठी गुंतवणूक योजनेत सहकार्य करत आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर वसई-विरार, मिरा रोडपर्यंतचे प्रवासी हे विखुरले जातील व अतिरिक्त भार कमी होऊन गर्दीपासूनदेखील दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा