रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन अनेक उपाय-योजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात. रेल्वे स्थानकातील पोलीसांच्या ताफ्यात वाढ करणं, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित करणं यांसारख्या अनेक सुविधा करण्यात येत आहेत. यामध्ये आता 'बॉम्ब शोधक-नाशक पथक' याची भर पडणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे सुरक्षा बलामध्ये 'बॉम्ब शोधक-नाशक पथक' दाखल होणार आहे. २० सप्टेंबरला या नवीन सुरक्षा यंत्रणेचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वे आरपीएफच्या ताफ्यातील 'बॉम्ब शोधक-नाशक पथक' हे पहिलेच विशेष पथक असणार आहे. या पथकात १२ आरपीएफ जवानांचा समावेश असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
एखादी बॉम्बसदृश वस्तू रेल्वे स्थानक आणि हद्दीत आढळल्यास किंवा बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी नियंत्रण कक्षात आल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाची एकच धावपळ उडते. अशा वेळेस बॉम्ब शोधण्यासाठी किंवा निकामी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला मुंबई पोलिसांची मदत घेण्याशिवाय पर्याय नसतो. मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडे सध्या श्वान पथक आहे. मात्र बॉम्ब शोधक-नाशक पथक नाही. त्यामुळे यात बराच वेळ जातो. या पथकाबरोबरच आरपीएफच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण असलेलं वाहनही ताफ्यात येणार आहे. त्यामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
मुंबई-ठाण्यासाठी गुरुवारी रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
सततच्या पावसामुळं भाजीपाला महागला