रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वाशी खाडी पुलावरील फूटओव्हर ब्रिजचा सांगाडा काढणारी एक क्रेन अचानक कोसळली. क्रेनबरोबरच ब्रिजचा सांगाडा देखील रस्त्यावर कोसळला. यामुळे सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. तर क्रेन हटवत वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती सी. पी. जोशी, सचिव, रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.
वाशी खाडी पुलावर मानखुर्द-वाशी दरम्यान आॅक्ट्राॅय टोल नाका होता. त्यामुळं पादचाऱ्यांना येणं-जाणं सोप व्हावं यासाठी एक फूटओव्हर ब्रिज उभारण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी हा टोलनाका बंद झाला. त्यामुळं या फूटओव्हर ब्रिजवरील वर्दळही बंद झाली. त्यातच या फूटओव्हर ब्रिजला एका ट्रकची धडक बसली. त्यानंतर फूटओव्हर ब्रिजची एक बाजू काढून टाकण्यात आली. पण दुसरी बाजू तशीच होती. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागानं ही बाजूही काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार वाहतूक पोलिसांची परवानगी घेत रविवारी क्रेनच्या सहाय्यानं फूटओव्हर ब्रिजचा सांगाडा काढण्याचं काम करण्यात येत होतं. क्रेनच्या सहाय्यानं काही वेळातच सांगाडा काढून बाजूला ठेवण्यात येणार होता. त्यामुळे वाहतूककोंडीचा तितकासा प्रश्न नव्हता. मात्र हे काम सुरू असताना अचानक क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि क्रेन पुलावर कोसळली. क्रेन कोसळल्याबरोबर ब्रिजचा सांगाडाही कोसळला. त्यामुळं १० मार्गिकेच्या वाशी खाडी पुलावरील ५ मार्गिका पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिका पूर्णत: बंद कराव्या लागल्याचंही जोशी यांनी सांगितलं.
या ५ मार्गिका बंद झाल्यानं वाशी खाडी पुलावर प्रचंड वाहतूककोडीं झाली असून त्याचा फटका बेलापूर, पनवेल, पेण आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालक-प्रवाशांना बसत आहे. दरम्यान पनवेलवरून मुंबईकडे येणाऱ्या ५ मार्गिकांपैकी १ मार्गिका पनवेलकडे जाण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. तर क्रेन आणि फूटओव्हर ब्रिजचा सांगाडा हटवत पाचही मार्गिका पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानुसार रात्री ७ वाजेपर्यंत हे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होईल, असंही जोशी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे.
हेही वाचा-
दिवाळीसाठी एसटीच्या ९३२० जादा फेऱ्या
ठाणे-मुंब्रा बायपास रोड वाहतुकीसाठी खुला, पण दुरुस्तीचं काम अपूर्णच