प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकारक आणि आरामदायी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळा (एमआरव्हीसी)ने एक योजना आखली आहे. या योजनेनुसार पश्चिम आणि मध्य रेल्वे सेवांचा विस्तार केला जाणार आहे. याशिवाय एलीव्हेटेड डेक, तिकीट बुकिंग कार्यालय, फुट ओव्हरब्रीज आणि स्कायवॉकची संख्या वाढवण्यात येईल. याबरोबरच अनेक स्थानकांची उंचीही वाढवण्यात येणार आहे. ही योजना मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आली आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या १९ स्थानकांवर या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल (स्थानिक), जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा आणि विरार येथे, तर मग मध्य मध्य रेल्वेच्या भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा आणि जीटीबी नगर, चेंबुर, गोवंडी, मानखुर्द स्टेशनवर प्रवासी सेवेचा विस्तार केला जाणार आहे. यासाठी जवळपास ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भारतीय रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरएसडीसी) च्यावतीने ९ स्टेशन्सची पुनर्बांधणी करणार आहे.